महापालिका चिटणीस पदाला वादाची किनार

पुन्हा एकदा प्रशासनाच्या कोर्टात हा चेंडू आल्यावर त्यांनी आता या प्रकरणात विशेष लक्ष घातले आहे.

74

मुंबई महापालिकेच्या चिटणीस पदाच्या नियुक्तीला पुन्हा वादाची किनार निर्माण झाली आहे. चिटणीस पदाच्या नियुक्तीलाच वादाचा इतिहास असून, प्रभारी चिटणीस संगीता शर्मा यांच्याऐवजी आपणच या पदाचे दावेदार असल्याचे सांगत उपचिटणीस शुभांगी सावंत यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे संगीता शर्मा यांनीही न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. यावरील अंतिम निकाल प्रलंबित आहे. असे असताना प्रशासनाकडून सावंत यांचा प्रस्ताव आणून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न होत आहे.

परंतु या वारंवारच्या तिढ्यावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे सामायिक सेवा ज्येष्ठता यादी. पण प्रशासन अशाप्रकारची सेवा ज्येष्ठता यादी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया आजतागायत राबवली नाही. त्यामुळे प्रत्येक चिटणीस यांच्या नियुक्तीला अशाप्रकारे वाद आणि कोर्ट कचेऱ्यांना सामोरे जावे लागत आहे .त्यामुळे या विभागाची एक सामायिक सेवा ज्येष्ठता यादी निर्माण केली जावी, अशी मागणी होत आहे.

(हेही वाचाः मुंबईतील केवळ १५ दवाखान्यांमध्ये १४ तास मिळतात उपचार सेवा)

प्रशासनाचे विशेष लक्ष

मुंबई महापालिकेच्या चिटणीस पदावरुन पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. यापूर्वीच्या चिटणीस विनीत चव्हाण या सेवानिवृत्त झाल्यानंतर या प्रशासनाने संगीता शर्मा यांच्याकडे चिटणीस पदाचा अतिरिक्त कारभार सोपवून, त्यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली. परंतु या पदाच्या दावेदार असलेल्या शुभांगी सावंत यांनी या पदावर दावेदारी सांगत एक वर्षाने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कोर्टात हा चेंडू आल्यावर त्यांनी आता या प्रकरणात विशेष लक्ष घातले आहे.

याआधीही झाला वाद

मात्र, चिटणीस पदाच्या नियुक्तीचा वाद आजचाच नसून यापूर्वी जेव्हा-जेव्हा नवीन चिटणीस यांची नियुक्ती झाली आहे, तेव्हा-तेव्हा विरोध झालेला आहे. प्रसंगी न्यायलयात दाद मागितली गेली आहे. यापूर्वी चिटणीस सुधा खिरे यांची नियुक्तीच्या वेळी तत्कालीन उपचिटणीस तुकाराम कारंडे यांनी प्रबळ दावेदारी सांगितली. परंतु या पदाची माळ खिरे बाईंच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर पुन्हा तुकाराम कारंडे आणि दीपा साळुंखे यांची दावेदारी असताना चिटणीस पदाची माळ गुणवत्तेच्या बळावर मृदुल जोशी यांच्या गळ्यात घातली गेली होती.

(हेही वाचाः खासगी-सार्वजनिक भागीदारीतून मुंबईत उभारणार चार्जिंग स्टेशन)

जोशी यांच्यानंतर आपण चिटणीस होणार अशी हवा नारायण पठाडे यांनी निर्माण केली होती. परंतु मृदुला कुलकर्णी यांची या पदावर प्रशासनाने नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे एका बाजूला पतीचे निधन आणि दुसरीकडे हे पद स्वीकारण्याची सोपवलेली जबाबदारी, यामुळे पतीच्या चितेला अग्नी दिल्यानंतर केवळ नियमानुसार कुलकर्णी यांना या पदाचा भार स्वीकारण्यासाठी त्याच अवस्थेत महापालिकेत यावे लागले होते.

सेवा ज्येष्ठता यादी नसल्याने वाद 

कुलकर्णी यांच्यानंतर नारायण पठाडे यांची नियुक्ती चिटणीस पदी झाल्यानंतर याला उपचिटणीस रजनीकांत संख्ये यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयात धाव घेऊन त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. पठाडे यांच्या निवृत्तीनंतर आलेल्या प्रकाश जेकटे यांच्या नियुक्तीच्यावेळी पुन्हा रजनीकांत संख्ये यांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तिथेही त्यांना अपयश आले होते. त्यामुळे या पदाच्या नियुक्तीचा वाद हा केवळ सामायिक सेवा ज्येष्ठता यादी नसल्यानेच वारंवार निर्माण होत आहे.

(हेही वाचाः म्हणून मुंबईत ऑटो रिक्षा होतात कमी)

त्यामुळे इंग्रजी आणि मराठी विभाग अशी वर्गवारी करुन आपणच ज्येष्ठ असल्याचा जो काही दावा केला जात आहे, त्यावर सामायिक सेवा ज्येष्ठता यादी बनवणे आवश्यक आहे. ही यादी बनवल्यास महापालिका चिटणीस विभागातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.