राजकीय नेत्यांमध्ये पसरतोय होलसेलमध्ये कोरोना! आता मंत्री एकनाथ शिंदे बाधित

85

राज्यभरात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगाने सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांना अर्थात राजकीय नेत्यांमध्ये होलसेलमध्ये कोरोनाचा संसर्ग होताना दिसतोय. महाराष्ट्रातील साधारण २० मंत्री आणि २० हून अधिक राजकीय नेते कोरोना बाधित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना देखील संसर्ग झाला आहे.

ट्विट करून काय म्हणाले शिंदे 

मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून असे म्हटले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

तर दुसरीकडे आजच खासदार अरविंद सावंत यांनीही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले की, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!”

(हेही वाचा – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह, म्हणाले…)

राजकीय नेत्यांना कोरोनानं गाठलं

कोरोनाच्या या लाटेत सर्वाधित राजकीय मंडळींना कोरोनानं गाठले असून सोमवारी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह आले. यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची बाधा झाली. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळेंसह त्यांच्या परिवाराला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे त्यांनी कळवली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.