मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्यता लक्षात घेता, नगरसेवकांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभागांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रभागांमधील फेऱ्या आणि गाठीभेटी वाढू लागल्या असून, हळदी कुंकू समारंभांच्या नावाखाली तर नगरसेविकांनी सोसायट्या, चाळी आणि घराघरांमध्ये शिरुन अप्रत्यक्षपणे प्रचारालाच सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः शिवसेनेच्या सत्तेत पहिल्यांदा बसणार प्रशासक)
नगरसेवक लागले कामाला
मुंबई महापालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणूक नियोजित मुदतपूर्व कालावधीत होण्याची शक्यता मावळली असून, ही निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. परंतु महापालिका प्रशासक नेमला तरी निवडणूक केव्हाही होऊ शकते, त्यामुळे पुन्हा एकदा नगरसेवकांनी जास्तीत जास्त वेळ प्रभागांमध्ये घालवण्याचा विचार सुरू केला आहे.
(हेही वाचाः काय सांगताय! मुंबईतील उंदिरही कोट्यवधींचे…)
असा होत आहे छुपा प्रचार
काही नगरसेवकांनी तर घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवण्याकडे भर दिला आहे. तर काही नगरसेविकांनी सोसायट्या, चाळींमध्ये हळदी कुंकू समारंभ आयोजित करून आपली चेहरापट्टी पुन्हा एकदा करून देण्यास सुरुवात केली. या हळदी कुंकू समारंभांच्या माध्यमातून महिला नगरसेवकांनी विभागातील महिलांशी संवादही साधण्यास सुरुवात केली आहे. तर काही नगरसेवकांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अशाप्रकारे हळदी कुंकू समारंभ आयोजित करत आपल्या इच्छुक उमेदवारांची ओळख करून देण्यास सुरुवात केली आहे.
(हेही वाचाः महापालिकेवर प्रशासक नेमण्याची घाई सरकारने का केली?)
शिवसेनेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत, सुजाता पाटेकर, भाजपच्या राजेश्री शिरवडकर, प्रीती सातम, काँग्रेसच्या सुप्रिया मोरे, श्वेता कोरगावकर आदींनी हळदी कुंकू समारंभांच्या नावाखाली विभागांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे.
Join Our WhatsApp Community