धक्कादायक! रोहयो मंत्र्याच्या गावातच रोजगार हमीचे बोगस कामगार!

ज्या कामगारांची नावे रोहयो कामगार म्हणून नोंदवण्यात आली, ते गर्भश्रीमंत आहेत आणि ज्या कालावधीत त्यांनी रोहयोचे काम केल्याची नोंद करण्यात आली, त्या काळात ते कोरोनाबाधित होते आणि उपचार घेत होते. 

95

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दररोज काम मिळावे, त्यामाध्यमातून चार पैसे मिळून त्यांचे कुटुंब चालावे, या उद्दात्त हेतूसाठी रोजगार हमी योजनाच्या अंतर्गत सरकारी कामे काढली जातात. मात्र गरिबांसाठीच्या या पैशावर सर्रास डल्ला मारला जातो. रोहयोमधील असा घोटाळा नित्याचाच झाला असला तरी यावेळी थेट रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्याच गावात हा घोटाळा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच गावात सरपंच आणि जिल्हापरिषद सदस्यही मंत्री भुमरे यांच्याच घरातील आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात संशयाची सुई मंत्री भुमरे यांच्या दिशेने जात आहे.

काय आहे हे प्रकरण? 

  • औरंगाबाद-बीड बायपास हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले.
  • वास्तविक हा रस्ता जेसीबी आणि पोकलेनचा वापर करून बनवला, नोंदीत मात्र कामगारांनी केल्याचे म्हटले.
  • या कामाचे पैसेही अदा करण्यात आले, ज्यांनी कामच केले नाही, अशी बोगस कामगारांची नावे दाखवून हे पैसे लुटण्यात आले.
  • हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोरडे यांनी स्वतः उघडकीस आणला.

(हेही वाचा : बॉम्बेहाय दुर्घटनेला ‘अ‍ॅफकॉन’चे शापूरजी पालनजी कारणीभूत!)

कोरोनाबाधित असताना कामगार होते कामावर! 

यामध्ये ज्या कामगारांची नावे देण्यात आली ते सर्व कामगार वास्तवात गर्भश्रीमंत आहेत. आणि त्यांची रोहयो कामगार म्हणून नावे नोंदवण्यात आली. त्यांच्या नावाने रोहयोचा पैसा अदा झाला. या सर्व प्रकारची ज्यांची नावे होती त्यांनाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे ज्या कालावधीत या बोगस कामगारांनी रस्त्याची कामे केल्याचे सांगण्यात आले. त्या कालावधी ते सर्व जण कोरोनाबाधित होते आणि उपचार घेत होते. त्यामुळे कोरोनाग्रस्त असताना हे सर्व जण रोहयोचे काम करत होते,असे दाखवण्यात आले आहे.

असे आहेत कामगार श्रीमंत!

  • या रोहयो कामगारांमध्ये पाचोड गावातील संगीता सुरेश बडजाते (वय वर्ष अवघे 60) यांचे नाव आहे. त्यांचे भले मोठे ट्रेडिंग दुकान आहे. त्यात सिमेंट आणि लोखंडाची विक्री केले जाते. तिथे त्यांचे पती सुरेश बडजाते होते. बडजाते कुटुंबीय करदाते आहेत. सुरेखा 9 एप्रिलला कोरोना पॉझिटिव आढळल्या होत्या. मात्र त्याच दरम्यान म्हणजेच 9 एप्रिल ते 15 एप्रिल आणि 16 एप्रिल ते 22 एप्रिल त्या रोजगार हमीच्या कामावर होत्या आणि त्यांना 2,940 रुपये दिल्याचे कागदपत्रात नोंद आहे.
  • सुरेश अशोक नरवडे आणि शिवकन्या सुरेश नरवडे हे मोठे शेतकरी आहेत. सुरेश यांच्या नावावर चार एकर, पत्नीच्या नावावर चार एकर आणि आईच्या नावावर साडेतीन एकर शेती आहे. कोरोना पॉझिटिव्ह असताना हे जोडपे रोजगार हमीच्या कामावर होते. सुरेश आणि शिवकन्या दोघेही 23 एप्रिलला कोरोना पॉझिटिव आढळले होते, मात्र ते 15 एप्रिल ते 21 एप्रिल आणि 22 एप्रिल ते 28 एप्रिल रोजगार हमीच्या कामावर काम करत होते, अशी नोंद आहे.
  • यश भुमरे आणि विनोद नरवडे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असताना रोजगार हमीच्या कामावर होते. त्यांच्या नावानेही पैसे दिले आहेत.

(हेही वाचा : राज्यपालांकडून घटनेचा भंग! संजय राऊतांच्या आरोप )

तातडीने चौकशी करावी! – प्रवीण दरेकर 

रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावात बोगस रोहयो कामगार दाखवून त्यांच्या नावाने रोहयोचा पैसा लुबाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करावी. याच गावात सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य हे मंत्र्याच्या घरातीलच नातेवाईक आहेत, याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

स्थानिक पातळीवर संताप! 

हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नावे रोहयोचे पैसे उचलले, त्यातले बरेच जण गर्भश्रीमंत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन मुख्यमंत्र्यांनी  मंत्री भुमरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे

काय म्हणाले मंत्री भुमरे?

कोरोनाची लागण झाली असताना एखादा व्यक्ती रोजगार हमीवर काम करु शकतो हे मलाही मान्य नाही. ही अनियमितता कशी झाली याची आम्ही चौकशी करु.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.