कोकणात कोरोनाचा रेड अलर्ट, तरी गणपतीला जाण्यासाठी गाड्या फुल्ल!

येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्यांची प्रतीक्षा यादी ३०० च्या पुढे गेली आहे. 

92

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा जरी कोकणाला विशेष परिणाम झाला नव्हता तरी दुसऱ्या लाटेने कोकणाला असा काही विळखा घातला आहे कि, त्यातून कोकणाची सुटका अजूनही होताना दिसत नाही. प्रत्येक आठवड्याला जेव्हा जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पडताळला जातो, त्यामध्ये कोकणातील पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तरीही रेल्वेने गणपतीसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आणि त्यासाठी चाकरमान्यांची अक्षरशः झुंबड उडाली. आताच या गाड्यांची प्रतीक्षा यादी ३०० च्या पुढे गेली आहे.

नियमावली लवकरच तयार होणार!

येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागली आहे. गेल्या वर्षी १८४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे अनेकांनी आठ ते दहा दिवस आधीच खासगी वाहनांनी कोकण गाठले. त्यामुळे कोकण रेल्वेला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला ८ जुलैपासून सुरुवात झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांचा आढावा घेऊन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल, असे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री  अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम! पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चिंताजनक स्थिती!!)

गणेशोत्सवानंतरच कोकणात कोरोनाचा शिरकाव!

मागील वर्षी गणेशोत्सव काळात कोकणात कोरोनाच्या विशेष प्रभाव नव्हता. मात्र जेव्हा कोरोनाबाधित मुंबई, पुण्यातून शेकडो चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी गेले, त्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने कोरोनाचा शिरकाव झाला, पुढे लग्न कार्य, समारंभ सुरु झाल्याने त्याचा फटका म्हणून कोकणात कोरोनाची रुग्ण संख्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढली. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात हजारो चाकरमान्यांनी गणेशोत्सवात कोकणात जाण्याचा बेत आखला आहे खरा मात्र कोकणासाठी यंदाचा गणेशोत्सव कसा असेल हे येणाऱ्या दिवसांतच स्पष्ट होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.