धक्कादायक! राज्यात तिसरी लाट आली, सुरुवात नागपुरातून!

129
राज्यात कोरोनाची अखेर तिसरी लाट आलीच, त्याची सुरुवात नागपूर जिल्ह्यामधून झाली आहे. त्यांनी ही लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात तातडीने काही निर्बंध लावावे लागणार आहे. हे निर्बंध येत्या २-३ दिवसांत लावण्यात येतील. त्याआधी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे सांगत नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये पुन्हा लॉक डाऊन लावण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

तीन दिवसांत निर्णय घेणारच! 

गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या दुहेरी अंकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले. त्यानंतर राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. आपण सारखे म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. त्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू, नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

विकेंड लॉकडाऊन? 

राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवली. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही दिले. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.सापडलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आहेत का, हे अहवाल आल्यानंतर समजेल. मात्र मागच्या वेळी जे घडले ते आता होऊ नये यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात याविषयी चर्चा करण्यात येणार आहे, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.