डिसेंबरपर्यंत सर्व होणार ‘लसवंत’… जे.पी. नड्डांचा दावा!

आतापर्यंत 18 कोटी भारतीयांचे लसीकरण झाले असून, डिसेंबर 2021 पर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी योजना आखण्यात आली असल्याचेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

79

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर होणा-या आरोपांना आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उत्तर दिले आहे. सर्व भारतीयांसाठी डिसेंबर 2021 पर्यंत लस उपलब्ध होईल, असे मोठे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी केले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असून, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोपही नड्डा यांनी केला आहे. राजस्थान मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित व्हर्च्युअल बैठकीत ते बोलत होते.

मोदींनी मार्चमध्येच दिला होता इशारा

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. पण या आरोपांना नड्डा यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2021 मध्येच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाच्या दुस-या लाटेबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. तसेच राज्यांना त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी केले होते, असे विधान नड्डा यांनी केले आहे.

(हेही वाचाः महत्त्वाची माहितीः कोरोना झाल्यानंतर कधी घेता येणार लस? आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना नव्या सूचना)

डिसेंबर पर्यंत भारतीयांना लस

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत भारत सध्या जगात अग्रस्थानी आहे. भारताने पहिल्यांदाच केवळ नऊ महिन्यांत दोन लसींची निर्मिती केली आहे. त्याद्वारे आतापर्यंत 18 कोटी भारतीयांचे लसीकरण झाले असून, डिसेंबर 2021 पर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी योजना आखण्यात आली असल्याचेही नड्डा यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व राज्यांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारला बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र

केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेस खूप मोठे षडयंत्र रचत आहे. टूल किटच्या माध्यमातून हे उघडकीस आलेच आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला आहे. समाजात अराजकता माजवण्यासाठी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

(हेही वाचाः धक्कादायक! कोरोना बनले काँग्रेसचे ‘हत्यार’! मोदींच्या बदनामीसाठी ‘टूलकिट’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.