देशात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुख्यमंत्र्यासह चर्चा केली. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा विचार असल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसह संवाद साधणार असून राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती अनिवार्य करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असे राजेश टोपे म्हणाले.
(हेही वाचा – राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ठाकरे सरकार जबाबदार! मोदींचा निशाणा)
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गर्दी असणाऱ्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क अनिवार्य होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात मास्कसक्ती अनिवार्य होण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे मास्कसक्ती नाही, असे म्हणता येणार नाही. दिल्लीत मास्क अनिवार्य आहे. त्या दृष्टीने बुधवारी मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात य़ेईल, असेही टोपेंनी सांगितले.
दहा लाखामागे महाराष्ट्रात ७ रुग्ण
पुढे टोपे असेही म्हणाले की, केंद्राने पंचसूत्रीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार, दररोज २५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यात बुधवारी ९२९ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात एका दिवशी ६५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रति मिलियन रुग्णांमध्ये महाराष्ट्र खूप खाली आहे. मिझोरम ६३५, दिल्ली २४८, केरळ ८२, हरियाणा ७३, कर्नाटक २८ आहे. दर दहा लाखामागे महाराष्ट्रात ७ रुग्ण आहे. काळजी घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. आम्ही त्यानुसार कारवाई करू.
केंद्राकडून धोरण आल्यानंतर लसीकरण सुरू करू
सध्या देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे. टेस्टींग, जिनोमिक सिक्वेसिंग, लसीकरण, ट्रॅकींग याप्रमाणे कार्यवाही करू, असे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच लसीकरण वाढविण्यावर भर देऊ. ६ ते १२ या वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली आहे. पण, त्यासाठी स्पष्ट धोरण केंद्राने जाहीर केले नाही. पण, नियम आल्यानंतर आम्ही लगेच लसीकरण सुरू करू. १२ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community