‘केंद्रीय’ जोर लावूनही सरकार पडेना म्हणून विरोधकांना फेस!

78

स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे, असा घणाघात शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात अग्रलेखात करण्यात आला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?, कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोलाही शिवसेनेने हाणला आहे.

(हेही वाचा : आता राज्यपालांच्या आणखी एका स्वाक्षरीची ‘प्रतीक्षा’!)

अहंकार शोभणारा नाही!

प्रश्न हा चंद्रकांत पाटीलांच्या धमकीचा नसून तो केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे. ‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ‘आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,’ अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ”केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु’, ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही, असेही सेनेने म्हटले.

बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण

सुसंवाद संपला आहे, महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत. राज्याचे पोलिस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत, पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांत पाटील यांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात, असेही शिवसेना म्हणाली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.