हिवाळी अधिवेशनातही क्रॉस व्होटिंग होणार?; सभापतीपदासाठी भाजपाला अतिरिक्त ७ मतांची गरज

151

राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे राज्याच्या सत्ताकारणाला हादरे बसले होते. येत्या हिवाळी अधिवेशनात त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक झाल्यास क्रॉस व्होटिंग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विधान परिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त असल्यामुळे सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून विधानपरिषदेचे सभापतीपदही रिक्त आहे. हे पद आपल्याकडे कसे घेता येईल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्याकडे सध्या २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागतील, म्हणजे आणखी सात मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळणार?

विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे घेण्यात भाजपला विशेष स्वारस्य आहे. नागपूर अधिवेशनात पहिल्या एक-दोन दिवसांतच सभापतीपदाची निवड करावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांच्याकडे कायम ठेवून विधान परिषद सभापती पदासाठी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे रासपचे महादेव जानकर हे नाराज असले, तरी ते भाजपसोबत असतील, असे मानले जाते. अपक्ष व लहान पक्षांच्या मदतीने हे संख्याबळ गाठता येईल का, याचीही चाचपणी केली जात असल्याचे समजते.

कोणाचे किती संख्याबळ?

  • भाजपा- २२
  • शिवसेना (ठाकरे गट) – ११
  • राष्ट्रवादी – ९
  • काँग्रेस – ८
  • जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी – १
  • अपक्ष ४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.