तब्बल बारा माणसांचा बळी घेणा-या ‘सिटी १’ या वाघाला पकडण्यात वनविभागाला सातत्याने अपयश येत आहे. गडचिरोलीतील वडसा येथील आठवड्याभराच्या मुक्कामानंतर ‘सिटी १’ पुन्हा गायब झाला आहे. माणसाला मारल्यानंतर ‘सिटी १’ लगेचच घटनास्थळाहून पळून जातो, हा वाघाचा स्वभाव विचित्र असल्याचे अखेर वनविभागाकडून मान्य करण्यात आले. वाघाच्या स्वभावात दिसून येणारा हा प्रकार विचित्रच असल्याचे राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहिप गुप्ता यांनी मान्य केले. त्यामुळेच ‘सिटी १’ ला पकडणे वनविभागासाठी आव्हानात्मक ठरत असून, वनविभाग त्याला जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
विदर्भातील वाढती वाघांची संख्या, मानवी वस्तीजवळच वाढलेल्या वाघांकडून आता मानवावर वाढते हल्ले, या सर्व घटनाक्रमांत ‘सिटी १’ ला जेरबंद करणे हे वनविभागासाठी दर दिवसाला आव्हानात्मक होऊ लागले आहे. याआधी राज्यात यवतमाळ येथील पांढरकवडा येथील अवनी या वाघिणीने तेरा माणसांचा बळी घेतला होता. अवनीचा मृत्यू हा वनविभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. अवनीच्या मृत्यूवरुन मोठा वादही निर्माण झाला होता.
५० वनाधिका-यांचे पथक आणि ३ वन्यप्राणी बचाव पथकाला दिला चकवा
गेल्या २४ तासांपासून तब्बल ५० वनाधिका-यांची टीम आणि तीन वन्यप्राणी बचाव पथकाची टीम सिटी१ ला शोधत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव पथक सिटी१ ला पकडण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना सिटी १ ला शोधण्याच्या ऑपरेशनची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. सिटी १ कडून पुन्हा अजून एका माणसाचा बळी जाऊ नये म्हणून वनविभाग गेल्या आठवड्याभरापासून गडचिरोलीतच त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गुरुवारी रात्रीपासून वडसा व नजीकच्या जंगलात वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रेपमध्ये सिटी १ ची हालचाल कैद झालेली नाही. त्यामुळे सिटी १ने पुन्हा वडसा सोडल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरु होत्या.
रात्रीचा प्रवास करतो
सिटी १ ला पकडण्यासाठी महिन्याभरापासून वनविभाग थर्मल ड्रोनचाही वापर करत आहे. पावसामुळे वाढलेल्या झाडीझुडपांमध्ये सिटी१ लपून राहतो. अभावानेच सकाळी संचार करतो. सिटी १ मोठे भौगोलिक अंतर रात्री पार करतो. माणसांवर हल्ले करुन पळ काढणा-या सिटी १मुळे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चारही जिल्ह्यांतील वनविभागाला त्याला पकडणे ही मोठी डोकेदुखी झाली आहे.
Join Our WhatsApp Community