केंद्राकडून बाल क्रांतिकारकांचा सन्मान : सावरकर बंधूंच्या कार्याचा होणार बहुमान

वीर सावरकर यांनी वयाच्या १२व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीचे कार्य स्वीकारले होते.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत बाल वयामध्ये सहभागी झालेल्या बाल क्रांतिकारकांच्या कार्याचा सन्मान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने त्यासाठी बाल क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भाजपचे खासदार डॉ. राकेश सिन्हा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत बनलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे कनिष्ठ बंधू नारायण सावरकर यांनी लहान वयातच त्यांच्या आयुष्यात भारतभूमीच्या स्वातंत्र्य चळवळीचा यज्ञ पेटवला होता. केंद्राच्या या संग्रहालयात वीर सावरकर आणि नारायण सावरकर यांच्या कार्याचाही बहुमान होणार आहे.

वीर सावरकर यांनी वयाच्या १२व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीचे कार्य स्वीकारले होते. त्यांच्यासोबत त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकरदेखील किशोरवयात या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनीही त्यांचे आयुष्य स्वातंत्र्य चळवळीत समर्पित केले.

लहान वयातच घेतली मोठी शपथ

वीर सावरकर यांनी वयाच्या १२व्या वर्षीच क्रांतिकारकांचे कार्य सुरु केले होते. त्यांनी या वयात स्वदेशी विषयावर आधारित ‘फटका’ सदर लिहिण्यास सुरुवात केली. प्लेगच्या महामारीत ब्रिटिशांनी नागरिकांना अत्यंत हीन वागणूक दिली, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केले. हे अत्याचार करणारा ब्रिटिश अधिकारी विल्यम चार्ल्स रॅन्ड याची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधू आणि रानडे यांना फाशी देण्यात आली. त्यातून वीर सावरकर यांच्यामधील रक्त सळसळून उठले आणि वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. त्याच बरोबर चाफेकर बंधूंच्या बलिदानाविषयी ‘फटका’मध्येही लिहिले.

संघटन उभे केले

वीर सावरकर यांनी बाल वयातच राष्ट्र भक्त समूह नावाची संघटना निर्माण केली. त्यानंतर जगभरात ‘अभिनव भारत’ या नावाने ते सर्वत्र पसरली. मित्र मंडळाच्या रूपाने ही संघटना कार्य करत होती. या माध्यमातून शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. वीर सावरकर यांनी या माध्यमातून सुरु केलेल्या तरुणाईच्या संघटन कार्यात वीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर हेही सहभागी झाले. वीर सावरकर यांची भाषणे आणि स्वातंत्र्य चळवळीचे स्फुरण चढवणारे कवी गोविंद यांच्या लोकगीतांनी नाशिकमध्ये स्वातंत्र चळवळ जागवली. ज्यामुळे मोठ्या संख्येने तरुण स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here