पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच वर्णी लागला असून, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रविवारी पार पडली. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत राहुल आणि प्रियंका गांधी, पी.चिंदबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसची सर्व सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडेच कायम राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोनिया गांधीच अध्यक्ष
पाचपैकी चार राज्यांत भाजपचा विजयी रथ रोखण्यात काँग्रेसला अपयश आले. इतकंच नाही तर पंजाबमध्ये आपने काँग्रेसच्या सत्तेला झाडूने झटकून काढले. काँग्रेसला सतत येत असलेल्या या अपयशामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले होते. याचसाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या आधी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची सूत्रे ही राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात यावीत, असा सूर काही काँग्रेस नेत्यांचा होता. त्यामुळे आता सोनिया गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अखेर काँग्रेसचे अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडेच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला आहे.
(हेही वाचाः ‘घोटाळे कराल तर…’ केजरीवालांचा मंत्री-आमदारांना धमकीवजा इशारा)
राजीनाम्यासाठी तयारी पण…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. इतकंच नाही तर सोनिया यांनी आपल्या भाषणात राहुल आणि प्रियंका गांधीही आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळून लावला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेस कार्यकारिणीने सर्वानुमते सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावं असा निर्णय घेतला. काँग्रेस लवकरच चिंतन शिबीर आयोजित करेल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp CommunityCongress interim president Sonia Gandhi in her speech said that if the party feels we all three (herself, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra) are ready to resign, but CWC unanimously rejected this: Sources pic.twitter.com/vYMRPkEW2D
— ANI (@ANI) March 13, 2022