cyrus mistry accident death : अपघाताची चौकशी करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश

131

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

आर्थिक जगताची मोठी हानी 

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली. प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति! पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री यांनी ट्विटद्वारे सांगितले.

(हेही वाचा Cyrus Mistry Death : टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू)

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

कसा झाला अपघात? 

प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.