राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या गौप्यस्फोटावर सध्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. “बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’वर येऊन रडले होते.” त्यांच्या या विधानावरून आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
या शब्दांत दादा भुसे यांनी केली टीका
आदित्य ठाकरे यांनी केलेले विधान हे अगदी बालिशपणाचे असून आपल्या पक्षाची बाजू मांडण्याची त्यांची ही केविलवाणी धडपड आहे. जेव्हा मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले तेव्हाच आदित्य ठाकरे यांनी सर्वांना हे सांगायला हवे होते. मात्र आता इतक्या महिन्यांनी हा दावा करण्यात काहीच हरकत नाही. सध्या ते राहुल गांधी यांचे अनुकरण करत आहेत. राहुल गांधी जसे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात पंतप्रधान मोदींबद्दल चुकीचे विधान करतात, त्याचप्रमाणे छोटे युवराज देखील त्यांचेच अनुकरण करत आहेत.
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर तसेच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकते. तसेच कोणी कोणाची भेट घ्यावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र एवढे खरे आहे की, काँग्रेस पक्षाला शिंदे-फडणवीस सरकारचा धाक बसला आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी, अन्यथा…; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा)
Join Our WhatsApp Community