ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते. “हे आहे मंत्री दादा भुसे, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरनार अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे, लवकरच स्फोट होईल. ” राऊतांनी केलेले हे ट्वीट मंत्री भुसे यांनी सभागृहात वाचून दाखवले आणि हे आरोप खोटे असल्याचे सांगत राऊतांवर टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले मंत्री दादा भुसे?
राऊतांनी केलेले ट्वीट वाचून दाखवल्यावर सभागृहात दादा भुसे म्हणाले, “या महागद्दाराने अशाप्रकारचे ट्वीट केले आहे. माझी सभागृहाला विनंती आहे की, जगाच्या पाठीवरील कोणत्याही यंत्रणेकडून या ट्विटची चौकशी करावी. या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो तर राजकारणातून मी निवृत्त होईन. आम्हाला गद्दार बोलणारे हे महागद्दार आमच्या मतावर निवडून आले आहेत जर त्यांनी केलेले ट्विट खोटे आढळले तर त्यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा.” अशी मागणी दादा भुसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यकडे केली आहे.
पुढे ते म्हणाले, “दैनिक संपादक पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा कारण हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची आणि माननीय पवारांची करतात. जर राऊतांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक या गद्दाराला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी टीका दादा भुसे यांनी राऊतांवर केली आहे. यावरून विधानसभेत एकच गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, मी पवारांबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community