मलबार हिलमधील बंगला नाहीच; ‘त्या’ दोन मंत्र्यांचे प्रयत्न ठरले निष्फळ

163

मलबार हिलमधील बंगला मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या शिंदे गटातील दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोघांनाही मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थान स्वीकारावे लागले.

( हेही वाचा : आमदार सदा सरवणकर कुठला ‘मार्ग’ निवडणार? )

मंत्रिमंडळ विस्तारानंतर २३ ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. मलबार हिलमधील प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बंगले मिळण्यासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच होती. त्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे पायघड्याही घातल्या. पण केवळ आठ जण यशस्वी ठरले. उर्वरितांना मंत्रालयासमोरील बंगले देण्यात आले. शिंदे गटातील दादा भुसे आणि तानाजी सावंत यांनी मात्र मलबार हिलचा हट्ट कायम ठेवला. त्यामुळे त्यांची नावे वगळून अन्य मंत्र्यांच्या बंगल्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाने २३ ऑगस्टला जाहीर केली.

कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने आधीच नाराज असलेल्या भुसे यांनी किमान मलबार हिलमध्ये बंगला मिळावा यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांच्या जोडीला तानाजी सावंतही होते. दोघांनी मिळून आधी शिंदेंकडे आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करून पाहिले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हट्ट पुरवण्यास साफ नकार दिल्याने एकनाथ शिंदे यांनीही दोघांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे भुसे आणि सावंत यांना मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानावर समाधान मानावे लागल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

आता कुठले निवासस्थान मिळाले?

सामान्य प्रशासन प्रशासन विभागाने ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना ब-३ (जंजिरा), तर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांना अ-९ (लोहगड) हे निवासस्थान देण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उपरोक्त दोन्ही बंगल्यांच्या डागडुजीचे काम बाकी असल्याने संबंधित मंत्र्यांना त्याचे वाटप करण्यात आले नव्हते. काम पूर्ण होताच मंत्र्यांना निवासस्थानांचा ताबा देण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

‘मलबार हिल’चा आग्रह का?

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले, तर अन्य मंत्र्यांना मंत्रालयासमोरची निवासस्थाने दिली जातात. मलबार हिलमधील बहुतांश बंगले हे समुद्र किनाऱ्याला लागून असून, आकाराने मोठे आहेत. शिवाय त्यांची रचनाही प्रशस्त अशी आहे. याऊलट मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेने लहान असल्याने मलबाल हिलमध्ये बंगला मिळवा, यासाठी राज्यमंत्रिमंडळातील सर्वच मंत्री प्रयत्नशील असतात.

मंत्री आणि त्यांचे सध्याचे शासकीय बंगले

१) एकनाथ शिंदे – वर्षा, नंदनवन, अग्रदूत
२) देवेंद्र फडणवीस – सागर, मेघदूत
३) राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
४) सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
५) चंद्रकांत पाटील – ब-१ (सिंहगड)
६) विजयकुमार गावीत – चित्रकुट
७) गिरीश महाजन – सेवासदन
८) गुलाबराव पाटील – जेतवन
९) संजय राठोड – शिवनेरी
१०) सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
११) संदिपान भुमरे – ब-२ (रत्नसिंधु)
१२) उदय सामंत – मुक्तागिरी
१३) रवींद्र चव्हाण – अ-६ (रायगड)
१४) अब्दुल सत्तार – ब-७ (पन्हाळगड)
१५) दीपक केसरकर – रामटेक
१६) अतुल सावे – अ-३ (शिवगड)
१७) शंभूराज देसाई – ब-४ (पावनगड)
१८) मंगल प्रभात लोढा – ब- ५ (विजयदुर्ग)
१९) दादा भुसे – ब-३ (जंजिरा)
२०) तानाजी सावंत – अ-९ (लोहगड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.