Dadar-Mahim विधानसभा मतदारसंघात उबाठाचे ठरले; हाच असेल उमेदवार!

2167
Dadar-Mahim विधानसभा मतदारसंघात उबाठाचे ठरले; हाच असेल उमेदवार!

दादर माहिम विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याबाबत तर्कविर्तक लढवले जात असले तरी या मतदारसंघाचा उमेदवार पक्षाने ठरवला आहे. शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिल्यास विद्यमान आमदार सदा सरवणकर किंवा हा मतदारसंघ महायुतीत मनसेला सोडल्यास माजी आमदार नितीन सरदेसाई यांना टक्कर देण्यासाठी उबाठाचा उमेदवार ठरला गेला आहे. त्यादृष्टीकोनातून त्या उमेदवाराने मतदारसंघात कामाला सुरु करून आपली छबी निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरु केला आहे. त्यामुळे उबाठात त्यांचा भावी आमदार म्हणूनही उल्लेख होत असून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ज्याप्रकारे विद्यमान खासदार अनिल देसाई यांना आधीच कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्याप्रकारची रणनिती आता माहिम दादर विधानसभा मतदारसंघात केली जात आहे. (Dadar-Mahim)

विभाग क्रमांक १० चे विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत शिवसेनेत गेल्यामुळे या विभागाच्या रिक्तपदाची जबाबदारी कुणावर सोपवावी या विचार करत उद्धव ठाकरे यांनी सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक आणि विरोधक असलेल्या माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांची विभागप्रमुखपदी ऑगस्ट २०२२ मध्ये नियुक्ती केली. दादर माहिम, वडाळा, धारावी या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असलेल्या महेश सावंत यांनी विभागप्रमुख म्हणून आपली चांगली छाप निर्माण केली आणि शिवसेनेत प्रथमच शिवसैनिक फ्रेण्डली विभागप्रमुख लाभल्याने शिवसैनिकांसह जनतेचे मनही ते जिंकू लागले आहेत. (Dadar-Mahim)

धारावी, माहिम-दादर आणि वडाळा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना विभाग क्रमांक १०च्या विभागप्रमुखपदी माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. महेश सावंत हे शिवसेनेत सामील झालेल्या आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर विरोधक समजले जात असून सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे या विभाग क्रमांक १० च्या विभागप्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात त्यांनी नकार दिल्यामुळे अखेर सावंत यांच्या गळ्यात विभागप्रमुख पदाची माळ घालण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. परंतु काँग्रेसमधून जाऊन आलेली व्यक्ती कट्टर शिवसैनिक कशी अशी चर्चाच आता शिवसैनिकांमध्ये सुरु आहे. (Dadar-Mahim)

(हेही वाचा – Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा!)

यांचा समक्ष भावी आमदार म्हणूनच उल्लेख

या विभागप्रमुख पदासाठी उपविभाग प्रमुख राजू पाटणकर तसेच माजी महापौर मिलिंद वैद्य, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, विलास राणे, राजू सुर्यवंशी, आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. विशेष म्हणजे उबाठाने विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांच्यावर विभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्याचाही विचार केला होता. परंतु विभागाच्या बाहेरील व्यक्तीला विभागप्रमुख बनवण्याची आजवरची परंपरा नसल्याने तसेच विभागातील नेत्यांवर अविश्वास दाखवण्यासारखे होईल, याच विचाराने शिवसेनेत सदा सरवणकर यांचे एकेकाळचे विश्वासू शाखाप्रमुख, परंतु त्यानंतर समाधान सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने बंडखोरी करत सरवणकर यांना आव्हान देणाऱ्या महेश सावंत यांना विभागप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला. (Dadar-Mahim)

परंतु महेश सावंत यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवतानाच धारावी, वडाळा आणि माहिम दादर या तिन्ही मतदार संघांमध्ये संघटनांत्मक बांधणी करून पक्षाला सुस्थितीत आणून ठेवले. लोकसभा निवडणुकीत सावंत यांनी केलेल्या कामांच्या जोरावरच आता त्यांना माहिम दादर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जवळपास जाहीर झाली असून शिवसेना भवनातच खासदार अनिल देसाई यांच्या समक्ष भावी आमदार म्हणूनच उल्लेख केला जात आहे. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात महेश सावंत हेच उबाठा शिवसेनेचे उमेदवार असतील हे आता नक्की झाले असून त्यादृष्टीकोनातून या मतदार संघाची अधिक बांधणी करण्याचा प्रयत्न सावंत यांच्याकडून सुरु आहे. या मतदार संघात विशाखा राऊत आणि साईनाथ दुर्गे यांच्या नावाची चर्चा असल्याचे ऐकायला येत असतानाच सावंत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याने ही नावे मागे पडल्याचेही बोलले जात आहे. (Dadar-Mahim)

(हेही वाचा – हरियाणातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण; CM Nayab Singh Saini यांची घोषणा)

उबाठाला ही निवडणूक जाणार जड

दादर माहिम विधानसभा मतदार संघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी डावलल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी मनसेचे नितीन सरदेसाई हे निवडून आले होते. परंतु त्यानंतर उबाठाने हा गड राखण्याचा प्रयत्न केला असला तरी या मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदार संघात अनिल देसाई यांना शेवाळेंपेक्षा सुमारे १३ हजार ९९० मते कमी मिळाली होती. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास उबाठाला ही निवडणूक जड जाणार आहे. (Dadar-Mahim)

सन २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या महेश सावंत यांचा मनसेचे संतोष धुरी यांनी पराभव केला होता, त्यानंतर २०१७च्या निवडणुकीत समाधान सरवणकर यांनी प्रभाग १९४ मधून उमेदवारी दिल्याने महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवत आव्हान दिले होते. त्यात समाधान सरवणकर हे विजयी झाले, पण तेव्हापासून महेश सावंत हे सरवणकर यांच्यापासून दूर झाले होते. त्यामुळे सरवणकर व सावंत हे राजकीय हितशत्रू असल्याची ओळख या विभागात होती. त्यामुळे या सदा सरवणकर यांना आव्हान देत त्यांच्यासमोर विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यासाठी महेश सावंत हीच व्यक्ती योग्य असल्याचे शिवसेनेच्या सुनील शिंदे यांच्यासह अनेकांनी पक्षाच्या आणून दिल्यानंतर त्यांचे नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. (Dadar-Mahim)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.