स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांची बदनामी केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याची पोलिसांनी दखल घेतली असून, दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांनी रणजित सावरकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांचा अपमान केला होता. त्याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी 17 नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची नोंद घेत आता पोलिसांनी रणजित सावरकर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ‘या’ शहरात रात्र वै-याची आहे, पोलिसांनी नोंदवली सर्वाधिक अपघाती मृत्यूंची संख्या)
या आरोपांखाली केली तक्रार
राष्ट्रपुरुषांची बदनामी आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. तसेच याआधीही राहिल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानांबाबतची तक्रारही भोईवाडा न्यायालयात प्रलंबित असून, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असा विश्वास रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community