मुंबई : यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे रणशिंग फुंकणारे असल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाला राजकारणाची झालर चढताना दिसून येत आहे. दहीहंडी सुद्धा त्याला अपवाद नाही. मुंबई आणि महानगर परिसरात दहीकाल्याला यंदा राजकीय स्वरूप प्राप्त होत असून, मुंबई-ठाण्यातील नेते ‘प्रचारा’चे थर रचण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडीवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. मानाच्या मंडळांमध्ये बक्षिसांच्या रकमेवरून चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे गटात हंडीच्या माध्यमातून वर्चस्वाची लढाई रंगताना दिसत आहे.
आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर सुरू केलेली दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी टेंभी नाक्यावरील या उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. दिघेंच्या या मानाच्या दहीहंडीला जांभळी नाक्यावरून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आव्हान दिले आहे.
त्याशिवाय रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे यांच्यासह वरळीतील भाजपाच्या दहीहंडीतही प्रचाराचा ‘धुरळा’ उडणार आहे. शिवसेना भवनासमोर ‘निष्ठावंतांची’ दहीहंडी सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे.
(हेही वाचा-India ऐवजी Bharat; काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?)
लोकलमध्ये थेट प्रक्षेपण
यंदा पहिल्यांदाच दहीहंडीचे थेट प्रक्षेपण लोकल रेल्वेमधून होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ४० लोकल रेल्वेमधील जाहिरात स्क्रीन बुक करण्यात आल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.
मुंबईपेक्षा ठाण्यात चुरस
यंदा मुंबईपेक्षा सत्ताबदलाचे प्रमुख केंद्र ठरलेल्या ठाण्यात दहीहंडीची चुरस पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात यावर्षी तब्बल ५८४ हंड्या फोडल्या जाणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्तकनगर झेडपी मैदानात दहीहंडीचा थरार रंगणार आहे. त्यांनी यंदा ‘प्रो-गोविंदा’ही संकल्पना समोर आणली आहे. त्याशिवाय भाजपाच्या शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानची हंडी डॉ. घाणेकर नाट्यगृह चौकात, तर कृष्णा पाटील यांची गोकुळ दहीहंडी कॅसलमील चौकात असणार आहे. मनसेने भगवती शाळेच्या मैदानात आयोजन केलेले आहे. त्याशिवाय संकल्प चौकात रवींद्र फाटक यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे.
टेंबीनाक्यावर ग्लोबल इव्हेंट
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या टेंबीनाक्यावरील दहीहंडीना ग्लोबल इव्हेंटचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे त्याचे नेतृत्व आहे.
Join Our WhatsApp Community