राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत महाराष्ट्रातील देवदैवतांना कुलुपात बंद करून ठेवले आहे, तर दुसरीकडे रेस्टॉरंट, डान्सबार, वाईन शॉप सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार नेमके कोणासाठी काम करत आहेत? सरकारला सत्तेच्या लालसेपोटी आपल्या देवदैवतांचा विसर पडला आहे का?, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्यात मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने सर्वसामान्यांकडून होत आहे. या संकटाच्या काळात लोकांना जर कुठे शांतता भेटत असेल, तर ती धार्मिक स्थळांच्या ठिकाणी. परंतु ते आज शांततेच्या ठिकाणी कड्या-कुलुपांत बंद आहेत. मंदिराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद आहेत. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात रेस्टॉरंट, डान्सबार, वाईन शॉप सुरू आहेत. धार्मिक स्थळ सर्व सामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? याचे उत्तर राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा : उत्कृष्ट तपासाबद्दल ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्राकडून होणार गौरव!)
मुख्यमंत्री किती काळ कोविडचा आधार घेणार?
राज्यात लॉकडाउन करताना, एका बाजुला लोकांचा जीव कोरोनामुळे धोक्यात असल्याचे राज्य सरकार सांगत असताना सर्वसामान्य लोकांवर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे तरी आता सर्वसामान्य लोकांना लॉकडाऊन परवडणार नसून कोणतेही कारण पुढे करत राज्य सरकारने लॉकडाउन करू नये, अशी विनंती करताना दरेकर म्हणाले. ज्या आरोग्य व्यवस्था आहेत, त्या सक्षम करा. राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक व्यवस्थाही कोलमडली आहे, त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केल्यास सर्वसामान्य जनता उपासमारी आणि आर्थिक टंचाईने मरेल, अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community