दसरा मेळाव्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादाची ठिणगी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे खेळ सुरु असताना दोन्ही पक्षांकडून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले. त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात ध्वनी प्रदूषणाची मर्यादा १०१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली. ध्वनी प्रदूषणाच्याविरोधात लढणा-या आवाज फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या नोंदीत उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात ध्वनी प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यातुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात आवाजाची मर्यादा ९१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली.
(हेही वाचा – “तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!)
गेली दोन वर्ष कोरोनामुळे शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा झाला नव्हता. यंदा कोरोनाच्या सावटातून बाहेर येत पुन्हा शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा गाजला. उद्धव ठाकरे विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात दसरा मेळाव्याचे आयोजन केले. शिवाजी पार्क परिसरात नेत्यांची भाषणे सुरु होण्यापूर्वीच बालमोहन परिसराजवळ जमलेल्या जमावाने मोठ्या आवाजात ड्रम्स वाजवायला सुरुवात केली. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळील मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आवाजाची मर्यादा १०१.६ डेसिबरपर्यंत पोहोचली. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी बालमोहन परिसराजवळील भागांत मोठ्या प्रमाणात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले.
दुसरीकडे वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ांच्या प्रवेशावेळीच मोठ्याने गाणे सुरु केले गेले. सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आवाजाची मर्यादा ९१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली. आवाज फाऊंडेशनने शिवाजी पार्क परिसरात सायंकाळी साडेपाच ते पावणे नऊपर्यंत ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आयोजित दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषणाच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी सव्वा पाच ते रात्री साडेनऊपर्यंत आवाजाच्या मर्यादेचे मोजमाप केले. उद्धव ठाकरे गटात इतर नेत्यांनी मोठमोठ्याने भाषणे केली. त्यांचा गोंगाट माईकच्या साहाय्याने अजूनच जास्त नोंदवला गेला. एकनाथ शिंदे गटात इतर नेत्यांनीही जोमाने भाषणे केली परंतु एकनाथ शिंदे यांनी मोठ्या ताफ्यासह संकुलात प्रवेश करताना तसेच भाषण करताना सर्वात जास्त आवाज झाल्याने आवाज फाऊंडेशनच्या पाहणीत दिसून आले.
उद्धव ठाकरेंपेक्षा इतर नेत्यांचा गोंगाट मोठा
किशोरी पेडणेकर – ९७ डेसिबल
नितीन देशमुख – ९३.५ डेसिबल
आंबादास दानवे – ९६.६ डेसिबल
सुषमा आंधारे – ९३.६ डेसिबल
भास्कर जाधव – ९२.२ डेसिबल
उद्धव ठाकरे – ८८.४ डेसिबल
एकनाथ शिंदे गट
किरण पावसकर – ८८.५ डेसिबल
शाहराज पाटील – ८२.४ डेसिबल
राहुल शेवाळे – ७८.८ डेसिबल
धैर्यशील माने – ८८.५ डेसिबल
अरुणा गवळी – ८३.९ डेसिबल
शरद पोंक्षे – ८२.८ डेसिबल
गुलाबराव पाटील – ८६ डेसिबल
रामदास कदम – ८४.२ डेसिबल
एकनाथ शिंदे – ८९.६ डेसिबल