दाऊदचा भाऊ आणि नवाब आमने-सामने! ईडीकडून होणार चौकशी

137
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना समोरा समोर बसवून ईडीचे अधिकारी चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी गुरूवारी इकबाल कासकर याची न्यायालयात ईडी कोठडी वाढवून घेण्यात येणार असल्याचे ईडीच्या सूत्राकडून समजते.
मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ईडीच्या कोठडीत असणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याच्या चौकशीत नवाब मलिक यांचे मनी लाँडरिंग प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर ईडीने बुधवारी नवाब मलिक यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेऊन आठ तासाच्या चौकशी नंतर दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पीएमएलए विशेष न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

चौकशीत इकबाल काय खुलासा करणार

दरम्यान दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याची आज ईडी कोठडी संपलेली असून इकबाल कासकर याला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इकबाल कासकर याची ईडी कोठडी वाढवून मिळावी यासाठी ईडीकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. इकबाल कासकर आणि नवाब मलिक यांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची असल्यामुळे ईडीकडून इकबाल याची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इकबाल कासकर याची ईडी कोठडी वाढवून मिळाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याचा भाऊ इकबाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना समोर-समोर बसवून दोघांची चौकशी करण्यात येणार आहे. समोर-समोर करण्यात येणाऱ्या चौकशीत इकबाल कासकर काय खुलासा करणार किंवा या चौकशीतून काय पुढे येणार हे लवकरच समोर येईल अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.