महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सध्या सत्ताधारी महायुती व विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (DCM Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदाहून पुढे सरकतच नाही, मग मी काय करू?” असं विधान पवारांनी केलं आहे.
राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच लढवेल
अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले, “महायुती सरकारमध्ये जाताना मी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली होती. यात जे पी नड्डा, अमित शहा, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. आता इतर लोक काय म्हणत आहेत, त्याचे मला काहीही देणेघेणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच लढवेल. जागावाटपाच्या मुद्यावर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील.”
“आमची महायुती तुटणार नाही”
“कालच आम्ही अमित शहांशी चर्चा केली. त्यामुळे भाजप किती जागांवर लढणार, आम्ही किती जागा लढणार व एकनाथ शिंदेंचा पक्ष किता जागा लढवणार याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. आमची महायुती तुटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच लढेल. आमचा प्रयत्न राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा आहे. भूतकाळाचा विचार करणे सोडून दिले आहे. आम्ही आता भविष्याचा विचार करत आहोत.” (DCM Ajit Pawar)
जो 145 जागांचा जादुई आकडा गाठेल, तो…
“आमची महाराष्ट्राला पुढे नेण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रात जी काही विकासकामे होत आहेत, त्यासाठी केंद्रातून निधी आणण्याचे काम आम्हाला करायचे आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपानंतर आमदार होण्याची इच्छा असणारे अनेकजण इकडून तिकडे जातील व तिकडून इकडे येतील. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एकच आहे. जो 145 जागांचा जादुई आकडा गाठेल, तो त्या खुर्चीवर बसेल. माझी महत्त्वकांक्षा काय आहे हे मी आताच सांगणार नाही. तूर्त आमचे लक्ष महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे आहे.” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (DCM Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community