कुठलेही प्रकरण काढायचे आणि हंगामा करायचा, अशी विरोधकांची निती आहे. आमच्याकडे मोठे बाॅम्ब आहेत, ते आम्ही योग्य वेळेला बाहेर काढू. पण सध्या त्यांचे लवंगी फटाके पाहूया. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, गेले पंचवीस वर्षे नागपूर अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी येतात. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतो. हे स्थान आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे. जिथून राष्ट्रीयतेचे विचार घेऊन आम्ही देशात सर्वत्र काम करतो. त्या ठिकाणी ऊर्जा घेण्यासाठी आम्ही येतो. मंगळवारी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले असून, भविष्यातला भारत कसा असेल याचा वेध घेणारे पुस्तक असून सर्वांनी तो वाचावा आणि पुढे त्या दिशेने काम करावं अशी अपेक्षा असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, आज मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर ठराव मांडतील. विश्वास आहे की एकमताने तो ठराव मंजूर होईल, असंही ते म्हणाले.
याचं उत्तर विरोधकांना द्यावेच लागेल
सोमवारी बोलणाऱ्यांचे (उद्धव ठाकरे) मला आश्चर्य वाटले. अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, तेव्हा काहीच केलं नाही. सीमा प्रश्न काही आमचं सरकार झाल्यावर निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तो प्रश्न आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे सरकार चालवणारे असे भासवत आहेत, जसं हे सरकार आल्यावरच सीमा प्रश्न निर्माण झाला आहे. असा राजकारण कधीच झाले नाही. आम्ही विरोधात असतानाही सीमा प्रश्नावर सरकारच्या पाठीशी उभे राहत होतो.(केंद्रशासित प्रदेश करा) मागणी करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकतो. परंतु एवढे वर्ष हे का झालं नाही याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.
( हेही वाचा: ‘मंत्री दादा भुसे’ यांची युवकाला शिविगाळ; आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्वीट )
विरोधकांची ही “शूट अँड स्कूट”
फडणवीस पुढे म्हणाले की, विरोधकांची ही “शूट अँड स्कूट” अशी नीती दिसत आहे. कुठलेही प्रकरण काढायचे आणि त्यावर गोंधळ घालायचे. मात्र उत्तर घ्यायचे नाही अशा पद्धतीचे त्यांचे धोरण आहे. ज्याला ते बॉम्ब म्हणत होते ते लवंगी फटाके ही नाहीत.आमच्याजवळदेखील भरपूर बॉम्ब आहेत. मात्र ते केव्हा काढायचे हे आम्ही ठरवू, मात्र सध्या तरी यांचे लवंगी फटाके आम्ही पाहू, असा सूचक इशाराही फडणवीस यांनी दिला.
Join Our WhatsApp Community