राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना लागत नाही. एखादी मोहीम गाजावाजा न करता फत्ते करायची हा फडणवीसांचा स्वभाव. असाच एक सर्जिकल स्ट्राईक फडणवीस यांनी कसलाही गाजवाजा न करता केला.
कबरीभोवतीचे अतिक्रमण काढले
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला हाेता. त्यानंतर तिथेच त्याची कबर बांधण्यात आली. या कबरीभाेवती माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले हाेते. ते पाडले जावे यासाठी शिवप्रेमी आग्रही हाेते. त्यासाठी संघर्ष देखील झाला. आज प्रशासनाने कबरीभाेवतीचे अतिक्रमण काढले. इतक्या वर्षांनंतर अतिक्रमण हटल्याने हा फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक असल्याची चर्चा आता शिवप्रेमींमध्ये उमटू लागली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि या सरकारचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बनले आणि त्यानंतर गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली लागल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
(हेही वाचाः अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात; महसूल वनविभागाची कारवाई)
काँग्रेसला जमलं नाही ते फडणवीसांनी केलं
कित्येक वर्षे हा वाद सुरू होता. या दरम्यान अनेक सरकारं देखील आली. काँग्रेस सरकारच्या काळात तर काहीच कारवाई केली नव्हती, उलट आरोप केले जात होते. मात्र आता राज्यातले सरकार बदलले आणि गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा निर्णय निकाली लागला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हा निर्णय घ्यावा हे आधीच ठरले होते. तसेच ही कारवाई करण्यासाठी शिवप्रताप दिन योग्य असल्याचे मंत्रीमंडळाचे मत झाले. त्यानुसार कुणालाही कुठलीही माहिती आधी न देता स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ही मोहीम देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी करून दाखवल्याचे बोलले जात आहे.
शिवप्रताप दिनी केली कारवाई
ही कारवाई करून हिंदुत्ववादी सरकार असल्याचा मेसेज देखील या निमित्ताने सरकारला द्यायचा होता. हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराज यांनी जसा अफजल खानाचा कोथळा काढला, तसाच हिंदू राष्ट्रासाठी शिवप्रताप दिनी अशी कारवाई करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने केल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community