महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला खोक्यात बंद करण्याचे काम केले. ते म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिले. त्यामुळे दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १५ फेब्रुवारीला रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
या महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना खोक्यात बंद करुन टाकले. आता तरी खोके म्हणायचे बंद करा. पण रस्सी जळाली तरी रस्सीचा पीळ जात नाही. कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे आणि रामदास कदम यांनी त्या काळात खूप काम केले. मी देखील नेहमी सांगायचो की जर पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, त्यांना वाढवा. मात्र, याबाबतचा अनुभव रामदास कदम यांनी घेतला. नारायण राणे यांनी देखील याचा अनुभव घेतला. शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही तर जो काम करेल तो राजा बनेल असा आपला पक्ष आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी या देशानेच नाही तर जगाने नोंद घेतली. आता राजन साळवी आपल्याकडे आले आहेत. पण त्यांनी खरे तर अडीच वर्षांपूर्वीच आपल्याकडे यायला पाहिजे होते. पण आता ते आपल्याकडे आलेत. कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात राजन साळवी तरी कसे राहतील? मग तेही आले शिवसेनेत, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केला.
Join Our WhatsApp Community