एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वानखेडे यांना ट्वीटरवरुन धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. काही वेळातच हे ट्वीट डिलीटही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात समीर वानखेडेंनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहे. या धमक्या सोशल मीडियावरून वानखेडेंना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ट्वीटवरून दिली धमकी
समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे. समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ही माहिती दिली असून धमकीचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. आरोपीने वानखेडे यांना टॅग करून हे ट्वीट करत धमकी दिली होती. वानखेडेंनी त्यावर उत्तरही दिले होते. मात्र काही तासांतच आरोपीने हे ट्वीट डिलीट केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
(हेही वाचा – जखमी गोविंदांवर मोफत उपचार! शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आदेश)
वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार
समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र त्यावर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच जात पडताळणी समितीने नुकताच वानखेडे मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा निकाल दिला होता.
नवाब मलिकांविरोधात ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा
या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात भादंवि १८६० च्या कलम ५००, ५०१ आणि अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ च्या कलम ३ (१) (यु) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसून हिंदू महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा जात पडताळणी समितीने दिला नुकताच दिला. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले. त्यानंतर वानखेडे यांनी सध्या तुरुंगात असलेल्या मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.