गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष (BJP) जेपी नड्डा यांनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी करणा—या आमदारांचा काल चांगला समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? याचा निर्णय विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल, अशा भाषेत उभय नेत्यांनी स्थानिक नेत्यांना तंबी दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष (BJP) जेपी नड्डा यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही नेत्यांनी स्थानिक नेते आणि आमदारांशी चर्चा करून 65 नावाची पहिली यादी तयार केली आहे. उर्वरित 135 जागांवरील उमेदवारांची यादी सुध्दा लवकरच प्रदेश कार्यालयाकडून मागून घेतली जाणार आहे. मात्र, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे खूप गरजेचे आहे असे मत अनेक आमदारांनी व्यक्त केले. यावर शहा आणि नड्डा यांनी पक्षाची भूमिका एका ओळीत स्पष्ट केली.
ते म्हणाले की, भाजपने (BJP) आगामी काळातील सर्व निवडणुका सामूहिक नेतृत्वाखाली निवडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, पक्ष मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करणार नाही. एवढेच नव्हे तर, कुणाचाही चेहरा सुध्दा पुढे केला जाणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचे नाव विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरविले जाईल, असे उभय नेत्यांनी स्पष्ट केले. महत्वाचा मुद्या असा की, राजस्थानमध्ये अंतर्गत गटबाजीचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो, अशी हायकमांडला शंका आहे. यामुळे कुणालाही नेता म्हणून पुढे करायचे नाही आणि कुणी दुखावला जाणार नाही याची काळजी घेण्याचे पक्षाने ठरविले आहे.
(हेही वाचा M.S. Swaminathan : भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला – देवेंद्र फडणवीस)
एवढेच नव्हे तर, विधानसभेच्या निवडणुकीत एखाद्या आमदाराला मतदारसंघ बदलून हवा असेल किंवा कुणाला आपला मतदारसंघ सोडून दुस—या मतदारसंघातून निवडणूक लढायची असेल तर पक्ष याची परवानगी अजिबात देणार नाही, असेही शहा आणि नड्डा यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमधील भाजपचे (BJP) स्क्रीनिंग कमिटीने उमेदवाराचे नाव अंतिम केले असून, आता ही यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल इलेक्शन कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात राजस्थानसह पाच राज्यांतील निवडणुका होत आहेत. येथे थेट लढाई भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर सत्ता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. भाजपने येथे शक्ती पणाला लावली आहे. मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपकडून काही केंद्रीय नेत्यांना विधानसभेच्या मैदानात उतरविले जाणार आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात कुठल्याही परिस्थितीत राजस्थानची निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार काही नवीन चेहरे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी भाजपने चालवली आहे. काही केंद्रीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले जाणार आहे. त्यानुसार काही जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची समजते.
Join Our WhatsApp Community