देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना मलबार हिलमधील ‘सागर’ हा शासकीय बंगला त्यांच्या वाट्याला आला होता. आता उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरही ते याच बंगल्यावरून प्रशासकीय कारभार पाहत आहेत. मात्र, अपुरी पडणारी जागा आणि अन्य कारणांनी त्यांना ‘सागर’शेजारी असलेला ‘मेघदूत’ बंगलाही देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
कार्यालयीन वापराकरीता बंगला देण्याचा निर्णय
सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगल्याचे फेरवाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कामकाजाचा व्याप, तसेच पार्किंग, शासकीय कामकाजासाठी अपुरी पडणारी जागा पाहता ‘सागर’ बंगल्याशेजारी रिक्त असलेला ‘मेघदूत’ बंगला पुढील व्यवस्था होईपर्यंत कार्यालयीन वापराकरीता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : पुराचा मुकाबला करण्यासाठी साताऱ्यात उभारणार आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र )
त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगला देण्यासंदर्भात शुक्रवारी अधिकृत शासननिर्णय जारी करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या बंगल्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. ते पूर्णत्वास गेल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी या निवासस्थानासमोर लावण्यात आली.
Join Our WhatsApp Community