मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या आदल्या दिवशी गोविदांना खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला. गोविंदांना नाउमेद करायचे नाही म्हणून मी त्यावेळी प्रश्न उपस्थित केले नाही, पण असे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात असा टोला अजित पवार यांनी लगावला. दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असलेले अजित पवार शनिवारी नागपूर विमानतळावर बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. एखाद्या गोविंदाची शैक्षणिक पात्रता नसल्यास त्याला कशी नोकरी देणार हाही प्रश्न आहेच असे अजितदादा यांनी सांगितले. याबाबत सोमवारी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. दहीहंडीत सहभागी गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार असे अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री प्रतिनिधीत्व करीत असलेल्या ठाण्यात गोविंदांची संख्या जास्त आहे. मला कोणत्याही गोविंदांना नाउमेद करायचे नाही. पण उद्या गोविंदांना आरक्षण देऊन नोकरी देणार म्हणतात. मात्र स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय याबद्दल भूमिका स्पष्ट नाही. असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. एक वेळेला मला विम्याचा मुद्दा पटला. मात्र 5 टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही. आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही. क्रीडा विभाग किंवा इतरांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन निर्णय करायचे असतात याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
सरकार या धमक्यांना गांभीर्याने घेईल
मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्याच्या धमक्या आल्या आहे. अनेक वेळेला अशा धमक्या येतात. उद्योगपती अंबानी यांच्या कुटुंबाला धमकी आली होती. अनेक वेळेला माथेफिरू असे उद्योग करतात. तरी ही अशा धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे. राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा याबाबतीत सक्षम आहे. सरकारही या घटनांना गांभीर्याने घेईल असे वाटते.
( हेही वाचा: रायगडमधील संशयित बोटीत शस्त्रांनंतर, दोन चाॅपरही आढळले; आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल )
अधिवेशनात आवाज उठवू
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी भागात कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गेल्या महिन्याभरात अशा अनेक घटना घडल्याची माहिती आहे. शनिवारी तिथे जाऊन आढावा घेऊ आणि सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा मांडू असे ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि इतरत्र शेतीचे नुकसान झाले आहे. सोमवारी सरकार त्याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे. पालघरमध्ये एका भगिनिला प्रसूतीसाठी झोळीत न्यावे लागले, एकीला ऍम्ब्युलन्स मिळाली नाही. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना, अजूनही साध्या आरोग्य सेवा न मिळणे दुर्दैवी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथेही एक घटना घडली. या सर्व घटनांबद्दल अधिवेशनात आवाज उठवू असे पवार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community