कोकणवासीयांना भरघोस नुकसान भरपाई द्या! फडणवीसांची सरकारकडे मागणी

शासनाने निसर्ग चक्रीवादळात दिलेल्या तुटपुंज्या मदतीप्रमाणे मदत न देता, तातडीने पंचनामे पूर्ण करुन, भरीव नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करावे.

निसर्ग चक्रीवादळानंतर सावरण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या कोकणवासीयांना वर्षभराच्या आत पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाचा सामना करावा लागला. या चक्रीवादळाने राज्याला, विशेषतः कोकणाला चांगलाच दणका दिला आहे.   पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सर्वच तालुके या चक्रीवादळाने प्रभावित झाले असून घर, गोठे, शाळा, शासकीय इमारती, फळबागा, उन्हाळी पिके, मच्छिमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पशुधन व जीवितहानी देखील झाली आहे. कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या कटू आठवणी विसरण्याचा आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोकणवासीयांना चक्रीवादळाने पुन्हा रडवले आहे. याच पार्श्वभूमीवर लगेच दुसऱ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तीन दिवसीय कोकण दौऱ्याला बुधवारी सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करुन, नुकसानाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

एसडीआरएफ मधून तातडीने नुकसानभरपाईची घोषणा करा

महाराष्ट्राचा विचार केला तर सुदैवाने नुकसान झालेले क्षेत्र कमी आहे, पण ज्या भागात झाले आहे त्या नुकसानाचा आवाका मोठा आह. त्यामुळे शासनाने निसर्ग चक्रीवादळात दिलेल्या तुटपुंज्या मदतीप्रमाणे मदत न देता, तातडीने पंचनामे पूर्ण करुन, भरीव नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करावे. केंद्र सरकार एसडीआरएफला निधी देतच असते, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे. त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, त्यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी खानाव उसर आणि वावे येथील नुकसानग्रस्त भागाची, अलिबाग येथील कोळीवाड्यातील नुकसानग्रस्त घरांची तसेच बोटींच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)

कोळीबांधवांकडून फडणवीसांना साकडं

तौक्ते चक्रीवादळामुळे कोळीबांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळीबांधवांनी आज फडणवीस यांच्यासमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. आता पुन्हा आम्हाला नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे तत्काळ झालेल्या नुकसानीएव्हढी भरपाई सरकारकडून मिळवून द्या, अशी मागणी कोळीबांधवांनी या पाहणी दौऱ्यात केली. सरकारला भरघोस मदत देण्याला भाग पाडू, असा दिलासा यावेळी फडणवीस यांनी कोळीबांधवांना दिला.

१७२ गावांमध्ये वीजपुरवठा नाही

चक्रीवादळाच्या रौद्ररुपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. रायगड मधील १७२ गावे अजूनही अंधारात आहेत. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन शासनाने विशेष मनुष्यबळ उपलब्ध करुन युद्धपातळीवर वीज जोडणीचे काम करावे, अशी मागणीही फडणवीस यांनी या दौऱ्यात केली आहे.

(हेही वाचाः मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here