अहो आनंद दवे, जन गण मन हवे…

92

सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयांमध्ये हॅलो ऐवजी वंदे मातरम्‌ बोलण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर बरेच वाद-विवाद झाले. कॉंग्रेसने आता जय बळीराजा म्हणण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या कॉंग्रेसला शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखता आल्या नाही त्यांना बळीराजाची आठवण येणे हा सर्वात मोठा दुर्दैवी असा विनोद आहे. आता यात हिंदू महासंघाच्या अध्यक्षांनी उडी घेतली आहे.

( हेही वाचा : जितेंद्र आव्हाड यांना वंदे मातरम्‌ बोलायला का आवडत नाही? )

आनंद दवे हे विचित्र विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधानांमध्ये तथ्य नसते, केवळ वाद निर्माण करणारे विधानं ते करत असतात. आता वंदे मातरम्‌च्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले आहे की, “जन-गण-मन’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करावं” वंदे मातरम्‌ला जे विरोध करतात, त्यांच्यावर आम्ही टीका करतोच. त्यांचा आम्ही वेळोवेळी समाचार घेतो. परंतु वंदे मातरम्‌ स्वीकारताना जन गण मन ला विरोध का?

नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा ही मोहीम राबवल्यावर काहींनी या मोहिमेला विरोध केला. यातले काही लोक तर तिरंगा ऐवजी भगवा फडकवा म्हणत होते. भगव्या झेंड्याबद्दल प्रत्येक हिंदूच्या मनात आदर आहे, पण म्हणून तिरंग्याला विरोध? ही कोणती मानसिकता आहे? जन गण मन हे राष्ट्रगीत आहे आणि तिरंगा राष्ट्राची शान आहे. या तिरंग्यासाठी कित्येक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे जे भारतीय आहे ते ते हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्ववाद्यांचं वेगळं असं तत्व नाही. केवळ भारताचं भावविश्व हिंदू राहिलं पाहिजे. जेणेकरुन भारताची लोकशाही टिकून राहिल, भारतात संविधान टिकून राहील, विविधतेत एकता टिकून राहिल. भारतातलं हिंदूभावविश्व नष्ट झालं तर भारताचा पाकिस्थान होईल. सावरकरांची हिंदुत्ववादी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आनंद दवे यांच्यासारख्या समज नसलेल्या नेत्यांच्या मागे हिंदुंनी जाऊ नये.

आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकरांचा आदर्श आहे. त्या दृष्टीकोनातून आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचा जन गण मन या राष्ट्रगीताला विरोध नाही आणि तिरंग्यालाही विरोध नाही. किंबहुना हिंदुंमुळेच या दोन गोष्टींचं अस्तित्व भारतात आहे. नाहीतर भारताचा केव्हाच पाकिस्थान झाला असता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.