खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यात राजकीय संघर्ष वाढत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते, ते भारताने साफ फेटाळून लावले. कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तान समर्थकांचे मनोबल वाढवण्याचे केलेले प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. कॅनडातच खलिस्तान समर्थकांना पाठिंबा मिळत नसल्याने त्यांचे मनोधैर्य खचले आहे. भारतीय दूतावासात आंदोलन करण्याची त्यांची योजना यशस्वी झाली नाही आणि तेथे दोन डझन लोकही जमू शकले नाहीत. खलिस्तान समर्थकांच्या निदर्शनाच्या घोषणेमुळे ओटावा, टोरंटो आणि व्हँकुव्हरमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर संबंध बिघडले
खलिस्तान समर्थक फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येनंतर कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर यांच्या हत्येप्रकरणी भारत सरकारला गुन्हेगार ठरवले होते. यानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे खलिस्तान समर्थकांचे मनोबल वाढले, पण ते रस्त्यावर उतरताच त्यांचे मनोधैर्य खचले. खरं तर, खलिस्तान समर्थक गट शिख फॉर जस्टिसने कॅनडाच्या ओटावा, टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासात निदर्शने करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी या दूतावासांची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. भारतीय दूतावासांना बॅरिकेड्स लावून घेरण्यात आले होते.
खलिस्तान समर्थकांचे आंदोलन फसले
शिख फॉर जस्टिसचे संचालक जतिंदर सिंग ग्रेवाल यांनी कॅनडातून भारतीय राजदूताची हकालपट्टी करण्यासाठी मागणी केली; परंतु ही निदर्शने व्यर्थ ठरली. कॅनेडियन शिखांनीही निदर्शनांमध्ये भाग घेतला नाही. एकूण दोन डझन लोकांना जमवणे कठीण झाले. अशा स्थितीत आंदोलक दूतावासांपर्यंतही पोहोचले नाहीत. आंदोलनासाठी गेलेल्यांच्या हातात कॅनडाचा ध्वजही होता. या लोकांनी भारतीय तिरंग्याचा अपमान केला आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संख्येअभावी निदर्शन प्रभावी ठरले नाही आणि खलिस्तान समर्थक निराश दिसले.
Join Our WhatsApp Community