शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सोबतची महाविकास आघाडी मोडून उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपा यांची युती घडवून आणणार होते. यासंबंधी बोलणी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाली होती, शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगले संबंध झाले होते, मात्र नारायण राणे यांच्यामुळे संबंध बिघडले, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी, ५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
राणेंना जाब विचारला होता
सुशांतसिंग रजपूत यांच्या प्रकरणात नारायण राणे यांनी भाजपाच्या कार्यालयात जेव्हा पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्यावेळी आमच्यासारखे लोक जे ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात ते नाराज झाले होते. आम्ही भाजपच्या लोकांनाही विचारले होते की, तुमचे व्यासपीठ अशा कामासाठी का वापरू देता? त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, हा प्रकार आमच्या बहुतांश आमदारांनाही पटलेला नाही. एखाद्या तरुण राजकीय नेतृत्वाला पुढे चांगले भवितव्य असताना त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे एखाद्या कुटुंबातील तरुणाची बदनामी होत असेल तर त्या कुटुंबाला किती दुःख होते हे सर्वांना माहीत आहे. मला कुणीही सांगितले नव्हते तरीही मी स्वतःचे संपर्क वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी माहिती दिली होती. त्यांनी कदाचित याविषयी माहिती घेतली असेल त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला होता, असेच दीपक केसरकर म्हणाले.
(हेही वाचा पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला होता, पण काय बिनसले? केसरकरांनी सारेच सांगितले )
Join Our WhatsApp Community