केसरकरांचा भेसळकर का होतोय?

136

दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते आहेत यात वाद नाही. हिंदुस्थान पोस्टवर त्यांच्यावर आपण लेख लिहिला होता. पण सध्या केसरकरांचं वर्तन पाहता त्यांनी संजय राऊत यांना बेताल बडबड करण्यात मागे टाकायचं असं ठरवलेलं दिसत आहे. आज उठाव केलेल्या आमदरांमधले सगळेच आमदार संजय राऊतांच्या नावाने बोटे मोडत आहेत. शहाजीबापू पाटील यांनी देखील राऊतांवर प्रचंड टीका केली. माझा कट्ट्यावर ते म्हणाले की सर्वात आधी त्या संजय राऊतचं बोलणं बंद करा.

( हेही वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी?)

‘माझा आत्मा तुझ्या नि तुझा आत्मा माझ्यात’

आता ती भूमिका केसरकर निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. भाजपामधले राणे कुटुंब हे केसरकरांचे शत्रू आहेत आणि हे जगजाहिर आहे. त्यामुळे त्यांना राणे कुटुबांशी समस्या असणे स्वाभाविक आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर भाजपाचे संजय राऊत अशी टिका केली आहे. पण ते विसरले की किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी अनेकांचा भ्रष्टाचार उघड केला आहे आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे कायदेशीर कारवाई देखील होत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या हे संजय राऊत नाहीत.

केसरकर मात्र संजय राऊतांच्या भूमिकेत शिरले आहेत. ’माझा आत्मा तुझ्या नि तुझा आत्मा माझ्यात’ असा काहीतरी विचित्र प्रकार घडलेला दिसतोय. दीपक केसरकरांनी शिंदे गटाची बाजू उत्तमरित्या मांडली. याबद्दल सर्वांनीच त्यांचं तोंड भरुन कौतुक केलेलं आहे. पण आता त्यांना कदाचित शिंदे गट टिकेल की टिकणार नाही अशी भिती वाटत असावी. म्हणूनच की काय उद्या जर हे सरकार पडलं तर पटकन उद्धव ठाकरेंच्या गटात शिरता येईल, म्हणून ते उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत.

कोकणातला गड कोसळू शकतो

त्यांना ठाकरेंविषयी कितीही प्रेम वाटत असलं तरी ठाकरेंच्या मनात ते केवळ एक साधे आमदार आहेत आणि साधे शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे, राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मनात सर्व आमदारांविषयी काय भावना आहे हे वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे.

इतकी घृणा त्यांच्या मनात असूनही जर केसरकरांना ठाकरे-प्रेमाची स्वप्ने पडत असतील तर ते मनाने पूर्णपणे शिंदे गटात सामील झालेले नाहीत. अजूनही थोडी भेसळ आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते ठाकरेंचेही राहणार नाहीत आणि शिंदेचेही राहणार नाहीत. तिथे कोकणात राणे कुटुंबाला केसरकरांचा गड हवाच आहे. केसरकरांच्या अशा भेसळ वक्तव्यांमुळे त्यांचा कोकणातला गड कोसळू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.