ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवगर्जना सभेतून शिंदे गटाविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटावर निशाणा साधला. त्यामुळे सध्या सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देत, तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते असे म्हणाले.
‘आम्ही आमदारक्या पणाला लावल्या’
अहमदनगर येथे पत्रकारांसोबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचं नाव बाजूला करा. कारण तुम्ही त्यांचे विचार सोडलेले आहेत. आम्ही का बाळासाहेबांचं नाव बाजूला करावं? आम्ही आमच्या आमदारक्या शिवसेनेमध्ये राहण्यासाठी पणाला लावल्या आहेत. आम्हाला जर दुसऱ्या पक्षात जायचं होत, तर आम्हाला कुठलाही धोका नव्हता. कारण आम्हाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत होत. पण शिवसेनेची खरी ध्येय-धोरण यांचं पालन आम्ही करतोय म्हणून बाहेर पडावं लागलं. तोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नव्हता. तुमच्यातला माज कधी खाली आला नाही. ज्यावेळेला सत्ता गेली त्या दिवशी तुमचा माज खाली आला. मग आदल्या दिवशी काय वेगळं होत आज काय वेगळं आहे हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कोणतीही टीका करायची नाही. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. तसंच आदर रहावा असं तुम्हाला वाटतं असेल, तुम्ही सुद्धा संयमानं बोललं पाहिजे.
चोरांना मत देणार का? असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन पुढे दीपक केसरकर म्हणाले की, ‘दुसऱ्याला लागेल असं बोलायचं. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते. पण ते कोणाला कधी चोर का म्हणत नाही? ते कोणाला नाव का ठेवत नाहीत? तुम्हाला जे टिकवता आलं नाही, ते मला टिकवता आलं नाही म्हणजे कोणीतरी चोरलं अशा भ्रमात राहू नका. जनतेनं तुम्हाला जे मतदान केलं ते हिंदुत्व म्हणून केलं होत. भाजप-सेना युक्ती म्हणून केलं होत. हे तुम्ही विसरलात, ज्या मोदी साहेबांनी ३७० कलम दूर करण्याचं ध्येय दाखवलं, त्यांना तुम्ही शाबासकी देण्याएवढी माणूसकी दाखवली नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होत की, एक दिवस मला पंतप्रधान करा, त्या एका दिवसात मी ३७० कलम हटवून दाखवेन. पण काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाऊन तुम्ही जे केलंय ते बाळासाहेंबांच्या शब्दांना शोभणार नाही, कुटुंबियांना शोभणार नाही. म्हणून आदित्य काहीही बोलले तरी आम्ही समजू शकतो, त्यांचे वय आहे. अजान आहेत, म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो.’
(हेही वाचा- ..नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल का?; रामदास कदमांचा खोचक सवाल)
Join Our WhatsApp Community