शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सोबतची महाविकास आघाडी मोडून उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपा यांची युती घडवून आणणार होते. यासंबंधी बोलणी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाली होती, मात्र कोणत्या कारणाने ही चर्चा फिस्कटली याचा घटनाक्रम सांगून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी, ५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात खळबळ माजवून दिली.
मोदी भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार होते
वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संवाद सुरु झाला होता, दोघांची भेटही झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून जे काही समजत होते, त्यात खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसा असावा हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले आहे, ठाकरे कुटुंबाप्रती मोदी यांचे असलेले प्रेम वारंवार समोर येत आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी मांडल्या होत्या. जेव्हा उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाली होती, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मला माझ्या पदापेक्षा तुमच्यासोबत असलेले कौटुंबिक संबंध महत्वाचे वाटतात, असे सांगितले होते आणि त्यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. पण ज्यावेळी ते मुंबईला परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हे सगळे आधी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले पाहिजे. अन्यथा गैरसमज निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला, तो वेळ त्यांना देण्यात आला, या दरम्यान जी जी बोलणी होत होती, या सर्वांविषयी फक्त आमच्यापैकी ३ जणांना माहिती होती, त्या व्यतिरिक्त रश्मी वहिनींना माहिती होती. त्यामुळे काहीही खोटे बोलून कुणाचीही बदनामी करण्याची मला गरज नाही. जे घडत होते ते जसेच्या तसे मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणत आहे, असेही केसरकर म्हणाले.
(हेही वाचा दिल्ली वा-या वाढल्या की मंत्रीपदाच्या याद्या निश्चित होतात: दीपक केसरकर)
म्हणून बोलणी फिस्कटली
दरम्यानच्या काळात १२ लोकांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निलंबन जेव्हा झाले, त्यावेळी भाजपकडून निरोप आला की बोलणी सुरु आहे, असे निलंबन करणे चुकीचे आहे. त्यानंतर कशामुळे झाले माहित नाही पण नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले, बोलणी थांबली, पुढे २ महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकदाच यासंबंधी बोलणे झाले तेव्हा त्यांनी अशा लहान लहान गोष्टी होत राहतात, पुढेही अशा बोलणी होत राहतील, असे म्हणाले होते. त्यानंतरही आम्ही एकनाथ शिंदे यांना यासंबंधी सांगितले होते, तेही उद्धव ठाकरे यांना वारंवार भाजपासोबत जाण्याविषयी समजावत होते. एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनाही कल्पना दिली होती. खूप उशीर होत आहे, असेही सांगत होतो. ज्यावेळी मी आसामला निघून गेलो, त्यावेळी आमच्यापैकी एकाला उद्धव ठाकरे यांना भेटायला पाठवले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा आपण भाजपसोबत जाऊ असे सांगितले होते, जे भाजपलाही पटत नव्हते. त्यामुळे आम्ही शिवसेना संपवत आहोत, असे म्हणणे चुकीचे आहे. आजही आम्ही शिवसेनेसोबत आहोत, त्यामुळे आज जे महाराष्ट्रभर सांगत आहेत, हे चुकीचे आहे. जे तुम्ही करणार होतात ते आम्ही करत आहोत तर आम्ही चुकीचे कसे ठरतो, असेही दीपक केसरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community