शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणारी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याबाबत 11 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पक्षाच्या नव्या चिन्हासाठी तयार राहा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. याबाबत आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोला
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आम्ही राहावं अशी राज्यातील आणि राज्याबाहेरील शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे कुठेतरी इगोच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे पण हा वाद कुठेतरी संपला पाहिजे, अशी भावना मराठी माणसाच्या मनामनात आहे. त्यामुळे जर का उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली तर आजही यातून सुवर्णमध्य निघू शकतो, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन)
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्यातील सत्तासंघर्षावर 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला अधिकृत पक्षाची मान्यता मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कायद्याने जो काही लढा द्यायचा असेल तो आम्ही देऊ पण दुर्दैवाने त्या लढाईत अपयश आलं तर कोणीही गाफील राहू नका. शिवसेनेला मिळणारं नवं चिन्ह कमी अवधीत घरोघरी पोहोचवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. त्यामुळे आता शिवसेना आपल्या पक्षाचे अधिकृत चिन्ह गमावणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community