किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी उद्गार काढल्यानंतर शिंदे गटातील आमदारही खवळून उठले आहेत. दीपक केसरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पक्ष प्रमुखांबद्दल बोलाल तर खबरदार, असा इशाराच दिला आहे.
सोमय्यांच्या विधानाविरोधात नाराजी
केसरकर म्हणाले, मुंबईत आल्यानंतर जेव्हा भाजपसोबत आमची पहिली बैठक झाली, तेव्हा आमच्या कुटुंब प्रमुखांबाबत कुणीही काहीही बोलू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्याबाबत भाजपच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शविली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी एका पत्रकार परिषदेत पक्ष प्रमुखांबद्दल उद्गार काढले. त्यामुळे आमदारांसह कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली. याबाबत मी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष भेटही घेतली. त्यावेळी त्यांनी सोमय्यांशी स्वतः चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
मीही शब्द मागे घेतो
त्यानंतर शनिवारी सकाळी माझे किरीट सोमय्यांशी बोलणे झाले. यापुढे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही. पण संजय पांडे, अनिल परब यांच्याविरोधातील लढा मात्र सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे. यापुढे आपल्याला युती म्हणून एकत्र काम करायचे आहे, त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचेल, असे वक्तव्य कोणीही करू नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असे केसरकर यांनी सांगितले. या दरम्यानच्या काळात उद्विग्नतेमुळे माझ्याकडूनही काही उद्गार निघाले. सोमय्या हे भाजपमधील संजय राऊत असल्याचे मी म्हटले होते. याविषयी त्यांना वाईट वाटले असल्यास शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, असेही केसरकर म्हणाले.
एकत्र रहावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा
पक्षचिन्हावर आम्ही कोणीही दावा केलेला नाही. पण राज्यभरातील शिवसैनिक आमच्याशी संपर्क साधत असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला याबाबत ते आनंद व्यक्त करत आहेत. फक्त घर एकत्र रहावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
बाळासाहेब असते तर…
महाराष्ट्राला समृद्ध अशी राजकीय आणि सामाजिक संस्कृती लाभली आहे. परंतु काही लोकांकडून तिला छेद दिला जात आहे. एकीकडे शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्याऊलट वागायचे. जर बाळासाहेब असते तर अशा वाचाळविरांचे काय केले असते, हे सर्वसामान्य शिवसैनिक जाणतात, अशी टीका केसरकर यांनी केली.
मोदींचे आकर्षण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना लहान भाऊ मानतात. आम्हालाही मोदींचे आकर्षण. जो भाजप उत्तरेकडील काही भागांपुरता मर्यादित होता, त्याने आता संपूर्ण देशभर अस्तित्त्व निर्माण केले आहे. त्यामागे एक चेहरा आहे, तो म्हणजे मोदी. ते आमच्या युतीचे नेते होते. त्यांच्या नावावर आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो. ही बाब विचारात घेऊन तरी उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भूमिका घ्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community