एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर काही राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत होत्या. मात्र आता त्याच शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होतांना दिसतेय. इतकेच नाही तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सेलिब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर गेल्या कुठे… असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुषमा अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या निशाण्यावर बारामती, पुणे दौऱ्यादरम्यान ‘मनसे’त इनकमिंग)
ठाकरे गटाचा सेलिब्रिटी चेहरा दीपाली सय्यद आता शिंदे गटात जाणार का? असा सवाल उपस्थित होत असताना एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना दीपाली सय्यद यांनी सूचक वक्तव्य केले आहे. या सूचक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद
मी स्क्रिनवर येऊन तूतू-मैंमैं करत नाही. ज्यावेळी गरज होती तेव्हा मी केली. त्यावेळी सगळ्या गोष्टी मी माझ्या अंगावर घेतल्या. प्रत्येकवेळी स्क्रिनवर येऊन टीका करणे योग्य नाही. आता सुषमा अंधारे सेनेमध्ये आल्यात त्यांना प्रुफ करायचं आहे की, मी सेनेत आले सेनेत माझे अस्तित्व आहे. मला सेनेत साडेतीन वर्ष झालेत. मी काम करत आहे. स्क्रिनवर येऊन टीका करणे म्हणजे सक्रिय आहे असे नाही. मला दोघेही एकत्र यावं हे वाटतं होतं. या अशा राजकीय परिस्थितीचा कार्यकर्त्यांवर परिणाम होत असतो.
सध्या प्रत्येकजण आपापलं मत मांडत प्रत्येक जण आपला गट करत आहेत. हा माझा गट तो तुझा गट असे राजकारणात सुरू आहे. एक दिवस माझाही गट असेल, असेही वक्तव्य सय्यद यांनी केली. शिवसेना कोणाची हे अजून ठरलेले नाही. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि भविष्यात लवकरच तुम्हाला माझी भूमिका कळेलच, असेही त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community