काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. भाजप खासदारांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींनी देशवासीयांची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरली. लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘या सभागृहाचे सदस्य राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला आहे. त्यांच्या विधानाचा या सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध केला पाहिजे आणि त्यांना सभागृहासमोर माफी मागण्यास सांगितले पाहिजे, अशी माझी मागणी आहे.’
भारतातील जनतेचा आणि संसदेचा अपमान
तसेच राज्यसभेत भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, राहुल गांधी हे प्रमुख विरोधी पक्षनेते आहेत. ते परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर लज्जास्पद हल्ला करतात. त्यांनी भारतातील जनतेचा आणि संसदेचा अपमान केला आहे. भारतात भाषण स्वातंत्र्य आहे आणि खासदार संसदेत बोलू शकतात. राहुल गांधींनी संसदेत येऊन देशातील जनतेची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.
राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
शिवाय केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लंडनमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, खासदारांना संसदेत बोलू दिले जात नाही. हा लोकसभेचा अपमान आहे. या वक्तव्यावर सभागृह अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आमच्या लोकशाहीचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
२ वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा कामकाज तहकूब
गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभा कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. पुन्हा २ वाजता दोन्ही सभागृहात कामकाज सुरू होईल.
(हेही वाचा – Money Laundering: राऊतांचे आरोप राहुल कुल यांनी फेटाळले; म्हणाले, राजकीय आकसापोटी…)
Join Our WhatsApp Community