दसऱ्या मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच चढाओढ सुरू आहे. मात्र शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी अद्याप कोणालाच पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. महिना उलटून गेला तरी परवानगी का दिली जात नाही, असा जाब यावेळी पालिका अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. सेनेच्या उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने पालिका कार्यालयात धडक दिली होती.
(हेही वाचा – शिवाजीपार्क दसरा मेळावा प्रकरणी महापालिका विधी विभागाचा अभिप्राय घेणार?)
जी उत्तर कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रशासनावर आमचा काडीचाही विश्वास राहिलेला नाही. २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज कऱण्यात आला आहे. महिना उलटून गेला तरी परवानगी देण्यात आलेली नाही. विधी खात्यातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे परवानगी देता येत नसल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पण आता आम्हाला परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर जमणार आहोत.
पुढे ते असेही म्हणाले की, शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव आहे. एका वेगळ्या प्रकारचा दबाव महापालिकेवर आहे. कारण एक महिन्यांचा वेळ होऊन गेला तरी यावर कोणताच निर्णय झाला नाही. दुसऱ्या गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. मात्र या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याचा इथे काही संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community