राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा एकदा मिळविण्याच्या निर्धाराने राणा भीमदेवी थाटात दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागला आहे असून सर्व ३० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. (Delhi Assembly Election 2025)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकूण ३० ठिकाणी आपले उमेदवार उतरवले होते, त्यापैकी ५ ते ६ जागावर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयाच्या लढतीत राहतील असा दावाही केला होता. मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना केवळ ०.०३ टक्के इतकीच मते मिळाली आहेत. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीतील अपयशाचे विश्लेषण केले जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिल्ली विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर देशातल्या अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे पवार यांनी म्हटले आहे. (Delhi Assembly Election 2025)
दिल्लीतील विजयाबद्दल अजित पवारांकडून मोदी, शाहांचे अभिनंदन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या ४० हून अधिक जागा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाच्या प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्लीतही मोदी यांच्या विचारांचे सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचे, देशाच्या राजधानीचे सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच दिल्ली विधानसभेतील निर्णायक विजयाबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. (Delhi Assembly Election 2025)
हेही पहा-