Delhi Assembly Election : माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्याच्या मुलांमध्ये प्रतिष्ठेची लढत

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघावर दिल्लीकरांचे लक्ष

59
Delhi Assembly Election : माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्याच्या मुलांमध्ये प्रतिष्ठेची लढत
  • वंदना बर्वे

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरात सुरु आहे. सर्वच पक्ष जोमाने प्रचार करीत असूनही चर्चेचा विषय मात्र नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ आहे. कारण या मतदारसंघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्या मुलांमध्ये थेट लढत होणार आहे. शिवाय येथील विजयी उमेदवार थेट मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो, असे म्हटले जाते. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथून निवडणूक लढत आहेत. तर भाजपाने माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे. (Delhi Assembly Election)

तसेच कॉंग्रेसनेही माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना मैदानात उतरविले आहे. शीला दीक्षित तीनवेळा येथून विजयी झाल्या आणि तिन्ही वेळा त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. याशिवाय सर्वाधिक उमेदवार याच मतदारसंघात आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीची आठवी विधानसभा निवडण्यासाठी होत असलेल्या निवडणुकीत आम आदमी पक्ष, भाजपा आणि कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 70 जागांसाठी 981 मतदार मैदानात आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – D Gukesh : हरिकृष्णावरील विजयासह डी गुकेश टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरित्या अव्वल)

अशात, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय नेते आणि विश्लेषकांसह तमाम देशवासीयांचे लक्ष लागले आहे. याची तीन प्रमुख कारणे आहेत. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथून निवडणूक लढत आहेत, हे पहिले कारण. केजरीवाल यांना पराभूत करण्यासाठी भाजपा आणि कॉंग्रेसनेही दिग्गज उमेदवार उतरविले आहेत, हे दुसरे कारण आणि तिसरे कारण सर्वात महत्त्वाचे आहे. ते असे की, नवी दिल्ली मतदारसंघातून जो विजयी होतो तोच दिल्लीचा मुख्यमंत्री होतो. (Delhi Assembly Election)

यामुळे सर्व पक्षांनी या ठिकाणी जोर लावला आहे. भाजपाने माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे. ते मागच्या लोकसभेत पश्चिम दिल्लीचे खासदार होते. नवी दिल्ली मतदारसंघ पश्चिम दिल्लीत येत नसतानाही भाजपाने वर्मा यांना उमेदवार बनविले आहे, हे येथे उल्लेखनीय. कॉंग्रेसनेही माजी मुख्यमंत्री स्व. शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना मैदानात उतरविले आहे. शीला दीक्षित तीनवेळा येथून विजयी झाल्या आणि तिन्ही वेळा त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – ST Corporation ला २५ हजार नव्या लालपरी बसेस; अर्थमंत्र्यांची तत्वतः मान्यता)

नवी दिल्ली मतदारसंघ म्हणजे दिल्लीची शान

नवी दिल्ली मतदारसंघ म्हणजे दिल्लीची शान. राष्ट्रपती भवन, संसद, पंतप्रधानांचे निवासस्थान, पंतप्रधान कार्यालय, केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय, मंत्र्यांचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायमूर्तींचे निवास, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, इंडिया गेट, कर्तव्यपथ, नवीन आणि जुने महाराष्ट्र सदन, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे कार्यालय आणि केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांचे निवास असे सगळे काही या नवी दिल्ली मतदारसंघाचा भाग आहे. (Delhi Assembly Election)

यावरून सहज लक्षात येते की, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ किती महत्वाचा आणि वलयांकित आहे. विधानसभेची स्थापना झाल्यानंतर 1993 मध्ये पहिली निवडणूक झाली होती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून उदयास आलेल्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल येथून 2013, 2015 आणि 2020 अशा तिन्ही निवडणुकीत विजयी झाले होते. तत्पूर्वी, १९९८, २००३ आणि २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शीला दीक्षित जिंकल्या होत्या आणि तिन्ही वेळा त्या मुख्यमंत्री सुद्धा झाल्या होत्या. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Hotstar : “मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये?” मराठी समालोचन वरुन हॉटस्टारच्या कार्यालयात मनसेचा राडा)

येथे 146122 मतदार आहेत. यात 79978 पुरूष आणि 66143 महिला मतदार आहेत. केजरीवाल यांनी मागची निवडणूक 21697 मतांनी जिंकली होती. येथे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप आहे. अशात, केंद्र सरकारने आठवे वेतन आयोग नेमण्याची केलेली घोषणा निवडणुकीच्या निकालाला कितपत प्रभावित करते, हे बघावे लागेल. आप केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढत आहे तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जात आहे. तिन्ही राष्ट्रीय पक्षांनी महिलांना खूप आश्वासने दिली आहेत. अशात त्यांचा कौल कुणाला मिळतो? याकडे बरेच काही अवलंबून राहणार आहे. (Delhi Assembly Election)

दिल्लीत 2013 पासून केजरीवाल यांचे सरकार असल्यामुळे सत्ताविरोधी लाटेचा सामना आपला करावा लागत आहे. तर, दुसरीकडे, मागील 12 वर्षांत भाजपला केजरीवाल यांच्या विरोधात एकही तुल्यबळ चेहरा पुढे आणता आला नाही. अशातच, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून आणि महिलेला मुख्यमंत्री बनवून केजरीवाल यांनी मोठा डाव खेळला आहे. मात्र, महिलांसाठी केलेल्या घोषणा आणि आठवे वेतन आयोग नेमण्याचा निर्णय निकालात मोठी भूमिका बजावू शकते, असे म्हणायला हरकत नाही. (Delhi Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.