-
प्रतिनिधी
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. देशाच्या राजधानीत मराठी मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. शिवाय सर्वभाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. बंगाली, तेलगू, केरळ, बिहारी, उडिया, कोकणी, पूर्वाचल अशा अनेक भाषा आणि प्रांतांमधील लोकं मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्याचप्रमाणे मराठी लोकं देखील दिल्लीत सर्वत्र आहेत. यातील उच्चपदस्थ मंडळी सोबतच दिल्ली सरकार मध्ये नोकरी करणाऱ्याची संख्याही बऱ्यापैकी आहे. एवढेच नव्हे तर सांगली सातारा येथील 300 च्या वर मराठी कुटुंब फक्त सोन्याचा व्यवसाय करतात. करोलबाग, टिळक नगर, चांदणी चौक, गजियाबाद परिसरात सोन्या-चांदीची मोठी दुकाने यांनी थाटलेली आहेत. अनेक वर्षांपासून दिल्ली विधानसभा निवडणूक मतदान करतात. त्यांच्याकडूनच दिल्ली निवडणुकीविषयी मते जाणून घेतली. (Delhi Assembly Election)
अशात, मावळत्या सरकारचे कामकाज आणि येणाऱ्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मराठी लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विश्वासनगर मतदारसंघात ‘सह्यांद्री’ नावाने मराठी लोकांची सोसायटी आहे. विश्वासनगरबाबत सांगायचे म्हणजे, दिल्लीत केजरीवाल यांची लाट होती तेव्हाही विश्वासनगरमधून भाजपाचा उमेदवार विजयी होत आला आहे. केवळ विजयी झाला असे नव्हे तर प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढत गेली आहे. भाजपाने तीनवेळचे आमदार ओमप्रकाश शर्मा यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर आपने दीपक सिंघल यांना आणि कॉंग्रेसने राजीव चौधरी यांना तिकीट दिली आहे. विश्वासनगरमध्ये 107449 पुरूष आणि 92591 महिला मतदार आहेत. सह्याद्री सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्यामते, दिल्लीतील लोकांना दररोज ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केजरीवाल यांच्या सरकारने एकदाही केला नाही. त्यांचा 10 वर्षांचा काळ फक्त आरोप करण्यात आणि स्वतःला मोठं सांगण्यातच वाया गेला. सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिक उद्घाटनाच्या वेळी छान होते. मात्र, काही दिवसांतच त्याची अवस्था वाईट झाली. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – काँग्रेसची ‘EAGLE’ समिती स्थापन; निवडणुकीतील पारदर्शकतेवर नजर)
अतूल फणसाळकर यांच्यामते, माजी मुख्यमंत्री केजरीवाल भ्रष्ट राजकारणी आहेत आणि त्यांचे सरकार सपशेल अपयशी ठरली आहे. सरकारी बंगला, लाल दिव्याची गाडी, कॉंग्रेसशी मैत्री अशा कितीतरी गोष्टींवर केजरीवाल यांनी कानाला खडा लावला होता. पण वास्तविक चित्र फार वेगळे आहे. याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, कलम 370, ट्रीपल तलाक, समान नागरी कायदा ही सर्व आश्वासने पूर्ण केलीत, असे फणसाळकर म्हणाले. मराठी संस्कृतीच्या माध्यमातून दिल्लीतील मराठी माणसांना एकजूट करणारे वैभव डांगे 1999 पासून दिल्लीचे राजकारण जवळून पाहत आहेत. ते म्हणाले, स्व. पी. व्ही. नरसिम्हाराव देशाचे पंतप्रधान होते तेव्हा स्व. मदनलाल खुराणा दिल्लीचे मुख्यमंत्री होते. एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते तेव्हा साहिबसिंग वर्मा मुख्यमंत्री होते. स्व. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. परंतु, यांच्यापैकी कुणाच्याही काळात सीएम आणि नायब राज्यपाल यांच्यात असे भांडण झाले नाहीत जसे केजरीवाल यांच्या काळात होत आहे. मुळात, केजरीवाल यांना करायचे काहीच नसते. पण दाखवायचे सगळे काही असते. यास दिल्ली कंटाळली आहे. यामुळे दिल्लीत पुढील सरकार भाजपाचे येईल. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता नितीन तांबवेकर म्हणाले की, केजरीवाल यांनी उच्च शिक्षितांपासून ते मजुरापर्यंतच्या लोकांना धोका दिला आहे. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना दिल्लीचा विकास करता आला असता. मात्र, त्यांनी स्वत:ला समृद्ध करण्याचा मार्ग निवडला. (Delhi Assembly Election)
डॉ. निवेदिता मुरकुटे आणि सुचिता तांबवेकर यांनी सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांकडे केजरीवाल यांनी दुर्लक्ष केले असल्याचा मुद्या उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, दिल्लीत पार्क खूप आहेत. मात्र, सकाळी फिरायला जावू शकत नाही. टॉयलेट नाहीत आणि असेल तर व्यवस्था वाईट आहे. दारू पिणारे, जुगार खेळणारे तेथे बसून असतात. ई-रिक्षा उलट दिशेने धावतात आणि कुठेही पार्क करतात. झाडाखाली मंदिरे उघडली आहेत. जनावरे आणि पार्किंग रस्त्यावर करतात. यासर्व किरकोळ समस्या असल्या तरी सामान्यांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे त्या म्हणाल्या. सारिका तडवळकर म्हणाल्या की, दिल्लीची पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित येते हे मान्य. पण, राज्य आणि महानगर पालिका दोन्ही आपच्या ताब्यात आहेत. अशात, रस्ते, सांडपाणी, कचऱ्याचा ढीग, नाल्या साफ करून घाण उचलणे, ट्रॅफिक जाम यासारख्या समस्या सोडविणे पोलिसांची जबाबदारी आहे काय? या तर सरकार आणि मनपाने सोडविल्या पाहिजे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करून केजरीवाल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community