-
वंदना बर्वे
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जबरदस्त हार पत्करावी लागली. स्वतः केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत आहे. खरं तर केजरीवाल यांचा अहंकार पक्षाला बुडविण्यास कारण असल्याची चर्चा आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आणि कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षांला मिळालेले घवघवीत यश हे केजरीवाल सरकारने केलेल्या भ्रष्टाचारांमुळे असल्याचे बोलले जात आहे. (Delhi Assembly Election)
केजरीवाल जेलमधून बाहेर आल्यानंतर ही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वच गोष्टींचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. पण शेवटी सत्तेतून पायउतार व्हावेच लागले. काँग्रेसला फार अपेक्षा नसली तरी पुन्हा शून्यातून उभे राहावे लागणार आहे. आपच्या मोठ्या नेत्यांचा पराभव पचवून पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षात नवीन ऊर्जा निर्माण करावी लागेल. तर दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याची मोठी जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे. एकूणच पुढील पाच वर्षे सर्वच पक्षांसाठी कसोटीची राहणार आहेत. आपच्या दारुण पराभवामागे भाजपाचे मायक्रो मॅनेजमेंट आहे. आपच्या पराभवाच्या कारणांची यादी केली गेली तर त्यात केजरीवाल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे तुरूंगात जाणे यास पहिल्या क्रमांकावर ठेवावे लागेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, डॉ. सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांच्यासह तब्बल 16 जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खावी लागली. भ्रष्टाचाररहित प्रामाणिक राजकारण करण्यासाठी केजरीवाल राजकारणात आले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरूंगात जावे लागले. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – नवी मुंबई शहर बनले Drugs चे ‘हब’; एनसीबीच्या कारवाईत २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त)
दुसरे कारण, यमुनेच्या पाण्यात हरियाणा सरकारने विष मिसळल्याचा केलेला आरोप म्हणता येईल. यमुना स्वच्छ करू असा दावा केजरीवाल यांनी केला होता. मात्र, यमुना स्वच्छ होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रदूषित होत गेली. दिल्लीकरांना नळातून दूषित पाणी मिळू लागले होते. 10 वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहूनही आप सरकारला यमुना स्वच्छ करता आली नाही. अशातच, हरियाणावर पाण्यात विष मिसळविल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यंत्री नायबसिंग सैनी यांनी यमुनेचे पाणी पिऊन दाखविले. याचा फटका आपला बसला. (Delhi Assembly Election)
केजरीवाल यांनी बंगला आणि लाल दिव्याची गाडी घेणार नाही अशी हमी दिल्लीवासीयांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री बंगल्यावर झालेला अफाट खर्च आणि भाजपकडून ‘शीशमहल’चा झालेला प्रचार या गोष्टीमुळेही मतदारांनी आपकडे पाठ फिरविली असे म्हणायला हरकत नाही. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मतदानाच्या चार दिवसाआधी सादर केलेल्या बजटमध्ये 12 लाख पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला होता. प्रवेश वर्मा यांनी ज्या नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांचा पराभव केला त्या मतदारसंघात केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर राहतात. यामुळे आपच्या पराभवात बजटने सिंहाचा वाटा उचलला. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीत भाजपाच्या विजयाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे)
केजरीवाल यांनी महिला मतदारांची मते मिळविण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे दरमहा 2100 रुपये देण्याची प्रमुख घोषणा केली होती. याशिवाय, पुजारी-ग्रंथी यांना दरमहा 18000, वृद्धांना नि:शुल्क तीर्थयात्रा असे अनेक आश्वासन दिले होते. वीज आणि पाणी आधीपासून फ्री होते. मात्र, फ्री रेवडीची आपने सुरू केलेली परंपरा दिल्लीकरांना आवडली नाही आणि याचा फटका निवडणुकीत बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप सरकारला ‘आपदा’ सरकार म्हणून संबोधित केले. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकत्यामध्ये उत्साहाचा संचार झाला आणि ते कंबर कसून निवडणुकीच्या कामाला लागले. याचाही परिणाम निकालावर झाला. केजरीवाल यांनी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा ‘एकला चलो’चा मार्ग स्वीकारला. यामुळे कॉंग्रेसने सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उतरविले. या निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी आपच्या मतांचे विभाजन करण्यात त्यांना यश आले आहे. थोडक्यात आघाडी न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आपला भोवला असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी 28 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरविले. परंतु, याचा कोणताही फायदा पक्षाला झाला नाही. याउलट, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठ आमदार पक्ष सोडून भाजपात सामील झाले. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community