द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरुन देशात सध्या वादंग सुरु आहे. भाजप या चित्रपटाच्या समर्थनार्थ आहे तर काॅंग्रेस आणि इतर पक्ष हे या चित्रपटाच्या विरोधात आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा निषेध म्हणून भाजपा नेते तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन केले.
म्हणून हल्ला करण्यात आला
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची असल्याचे म्हणत आंदोलकांनी केजरीवाल यांच्या घराच्या गेटला भगवा रंग लावला. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर समाजकंटकांनी हल्ला केला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. गेटवर लावलेले बूम बॅरिअरही तोडण्यात आल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
( हेही वाचा: १ एप्रिलपासून सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका! काय महाग आणि काय होणार स्वस्त? )
आप नेत्यांनी केली टीका
यावरून आम आदमी पक्षाने आता भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शहा यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का? असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. तसेच आप नेते राघव चढ्ढा म्हणाले की, पंजाबमधील पराभवानंतर भाजपला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.