नोटांवर गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो हवा; केजरीवाल यांची मागणी

149

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे महात्मा गांधींसह गणपती आणि लक्ष्मी यांची प्रतिमा भारतीय चलनी नोटांवर लावण्याची मागणी केली. बुधवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती आणि देशाला विकसित करण्यासाठी ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ आवश्यक असल्याचे म्हणत हे सांगितले. नोटेच्या एका बाजूला गांधींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेशाचा फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.

दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार त्यांच्या मनात आल्याचे त्यांनी सांगितले. आपले अनेकांशी बोलणे झाले असून यावर कोणाचाही आक्षेप नसावा असेही ते म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, देवी-देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो तेव्हा प्रयत्नांना यश मिळते. अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भारत हा एक श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीयाने श्रीमंत कुटुंब व्हावे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. यासाठी बरीच पावले उचलावी लागतील. मोठ्या प्रमाणात शाळा उघडायच्या आहेत, रुग्णालये बांधायची आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. पण प्रयत्नांना यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला देवी-देवतांचा आशीर्वाद असेल. अनेकवेळा आपण पाहतो की, प्रयत्नांचे फळ येत नाही, मग असे वाटते की, देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळू शकते.

काय म्हणाले केजरीवाल?

केजरीवाल पुढे म्हणाले, “आदल्या दिवशी दिवाळी होती, आम्ही सर्वांनी गणेश आणि लक्ष्मीची पूजा केली. आम्ही शांततेसाठी प्रार्थना केली. आज मी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन करतो की, भारतीय चलनावर एकीकडे गांधीजींचे चित्र आहे, ते असेच राहावे, दुसऱ्या बाजूला गणेशजी आणि लक्ष्मीजींचे चित्र लावावे.

केजरीवाल पुढे म्हणाले की, आता छापल्या जाणाऱ्या सर्व नवीन नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचे चित्र असले पाहिजे. इंडोनेशियाचे उदाहरण देताना ते म्हणाले, “आम्ही म्हणत नाही की सर्व नोटा बदलल्या पाहिजेत, परंतु ज्या नवीन नोटा छापल्या जातात त्यावरून ते सुरू केले जाऊ शकते. हळूहळू नवीन नोटा चलनात येतील. इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. येथे 85 टक्के मुस्लिम, 2 टक्क्यांहून कमी हिंदू आहेत. तरीही त्यांनी आपल्या नोटेवर गणेशाचे चित्र छापले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, जे केंद्र सरकारने उचलले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.