- सुजित महामुलकर
उद्धव ठाकरे (Udhhav ठाकरे) यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) (वय २८) राजकारणात उतरणार, अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु झाल्या. जर त्यांनी राजकारणात प्रवेश केलाच तर त्यांचे ज्येष्ठ बंधू आदित्य (Aaditya) यांच्याशी संभाव्य सत्तासंघर्ष टाळण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
पवारांचा प्रयत्न फसला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा राजकारणात प्रवेश झाला तेव्हा त्यांचे काका शरद पवार यांचा राजकारणात दबदबा होताच. तेव्हा अजित पवार यांनाही लोकसभेतून दिल्लीच्या राजकारणात धाडण्याचा ज्येष्ठ पवारांचा प्रयत्न फसला, कारण अजित पवार यांचे दिल्लीत मन रमले नाही आणि त्यांनी राज्यात आपला जम बसवला.
(हेही वाचा – Drug Case : मुंबई विमानतळावर ४० कोटींच्या कोकेनसह महिलेला अटक)
शेवटी व्हायचं तेच झालं
अखेर शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतूनच दिल्लीला (लोकसभेत) पाठवले आणि दोघां बहीण-भावात राजकीय सत्तासंघर्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. शेवटी व्हायचं तेच झालं. आज राष्ट्रवादीची दोन शकले झाली आणि वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.
तेजस यांनी उद्धवना धीर दिला
बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच’ असा निकाल दिल्यानंतर खचलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. तेव्हा त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस यांनी शेजारी बसून त्यांना धीर दिला. तेव्हापासून उबाठा आणि माध्यमांमध्ये तेजस राजकारणात येणार, अशा चर्चांना उधाण आले. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. असे असले तरी आजोबांनी (बाळासाहेब ठाकरे) स्थापन केलेली संघटना अडचणीत असताना ती वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तेजस यांना राजकरणाच्या आखाड्यात उतरावेच लागेल, असा कयास शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
शिवसैकांना आनंद
उबाठाचे (UBT) खासदार अरविंद सावंत यांनीही तेजस राजकारणात येणार असतील तर आम्हाला आंनदच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
(हेही वाचा – Narendra Modi: अमली पदार्थांचे सेवन करू नका, आई-वडिलांचा आदर करा; पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधून दिले मोलाचे सल्ले)
माझ्यासारखा कडक डोक्याचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील आपल्या शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत तेजस यांच्याबद्दल उल्लेख करताना ‘माझ्यासारखा कडक डोक्याचा’ असे म्हटले होते. तसेच आपल्या आणि तेजसच्या आवडी-निवडी सारख्याच असल्याची काही उदाहरणे दिली होती. सध्या तेजस वन्यजीव छायाचित्रण (Wild Life Photogrqphy) या क्षेत्रात काम करतात, ज्यात त्यांना रस आहे.
यापुढे आम्ही जोरदार लढू
कधीही पत्रकार परिषदेला आणि पत्रकारांना सामोरे न जाणारे तेजस बुधवारी उद्धव यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बसले आणि पत्रकारांशी बोलताना “यापुढे आम्ही जोरदार लढू,” असे स्पष्ट केले. यामुळे पक्षाच्या कठीण काळात आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी तेजस राजकारणात आलेच आश्चर्य वाटायला नको तसेच दोन बंधूंमध्ये संभाव्य सत्तासंघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्ली अशी विभागणी (division) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community